वसंत बिरेवारचा दुसरा दिवस – ३

भाग ३ – अंतिम

त्यांनी गाय मारली म्हणून…

हं! तो अजून एक वादाचा विषय. राहू दे. सावरकर-सावरकर करणाऱ्या कोणालाच त्यांचे विचार झेपणारे नाहीत. सोयीचे गांधी क्वोट करता येतात तसेच सावरकरही सोयीचेच क्वोट केले जातात. असो. आपण आपली शाखा घ्यावी. बौद्धिक घेणं आपलं काम नाही. बापूरावांनंतर बौद्धिक घेणारं जबाबदार माणूस नाही. सांगितलं पाहिजे, शाखा सुरू झालीये, बौद्धिकासाठी व्यक्ती पाठवा. साधूलाच विचारावं काय? पण साधू आपल्याच दुनियेत. काहीतरी व्यवहार्य विचारायला जावं तर तो दोन अभंग फेकून आपल्याला गप्प करणार हे आपल्याला माहिताहे. तरी वसंतानं मनाचा धडा करून एकदा विचारलंच साधूला. खरं तर वसंताला साधूही बराच हिंदुत्ववादी वाटला होता. अभक्ष्य भक्षण नाही. पण गावात भिक्षा मागायला जायचा तेव्हा जे अक्षरश: काय मिळेल ते खायचा. लोकही तसलं काही त्याला द्यायच्या फंदात पडायचे नाहीत. शुभ्र दाढी वाढवलेला साधू आणि त्याच्या तोंडी अखंड असणारे अभंग ऐकून त्याच्याभोवती एक वलय असल्याचा भास व्हायचा. लोकांना थोडा आदरयुक्त दराराच होता त्याच्याबद्दल. हे प्रश्न तरी ऐकून साधू पेटून उठेल, आणि काहीतरी सडेतोड उत्तर देईल ही वसंताची अपेक्षा होती.

कसचं काय.

“विद्वान आहेस!” उद्गारुन त्यानं शाबासकीच दिली आपल्याला. मन काय भन्नाट गांगरलं होतं… कुठेतरी, छान, मोकळं वाटत होतं. काहीतरी, बरीच वर्षं मनावर ठेवलेलं जू क्षणभर काढून ठेवलंय असं वाटून गेलेलं. पण परिस्थितीची जाणीवही झाली लवकरच. साधूनं वेड्यात काढलं असावं बहुतेक आपल्याला. पण तो इतकंच म्हणाला- “तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदु:ख जीव भोग पावे!”
आणि मग गप्पच झाला तो एकदम. साधू हा इसम बापूराव, जोशीसर, कांबळे, शिंदे, अण्णा ह्यांच्यापेक्षा कैकपटीनं जास्त व्यवहारी आणि पुस्तकी ज्ञान बाळगून आहे असं आपल्याला नेहमी वाटायचं. ते का, हे कधी कळलं नाही. मध्यंतरी ते गायप्रकरण उद्भवलेलं तेव्हाही साधू गप्प होता. श्रेष्ठींकडून आदेश आलेले नसले तरीही अण्णा, गुल्हाने, हळदणकर इ. पेटलेले बरेच. काय तरी बघून येतात त्या युट्यूबावर आणि उगीच भडकलेले राहतात सदैव. ते यूट्यूब अजून एक. एकदा तुम्ही ते धर्माधारितच काहीतरी बघायला लागलात की फक्त त्याच धर्तीचे व्हिडीओ दाखवले जातात. हे व्हॉट्सॅपवरचं पब्लिकही तसंच. एकाला साधा विवेकानंदांचा – साध्य आणि साधनेतला उतारा पाठवला तर लगेच दर दिवशी आहे सकाळी सकाळी हनुमान चालिसातलं विज्ञान आणि आपल्या परंपरांतलं विज्ञान. एकदा साधूला हे दाखवलं होतं वसंतानं उत्साहात. त्याचा काही प्रतिसाद नाही. मग एकदा त्याला स्वच्छ प्रश्नच टाकलेला, की तुला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल. एरवी तुकोबा, रामदास, ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेबद्दल निर्झरासारखी ओघवणारी त्याची वाणी हे प्रश्न आले की एकदम गप्प व्हायची. का कोण जाणे, सदा प्रसन्न असणारा साधू एकदम गप्प गप्प व्हायचा. एखादा अभंग वगैरे म्हणत राहायचा. वसंत बराच वेळ ते ऐकत बसे, आणि कंटाळा आला की घरी जाई. देवळात तसंही कोणी फिरकायचं नाहीच.

मग आल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका.

एरवी निवडणुका म्हटलं की वसंताच्या अंगात दहा हत्तींचं बळ येई. पण आजकाल त्याला त्यातही रस उरलेला नव्हता. पक्षाकडून कोणी ‘क्ष’ उभे राहिले होते. वसंताला त्यांचं नाव जाणून घ्यायची गरज भासली नाही. विरुद्ध पक्षाकडून कोणी उभं राहण्याची चिन्हं नव्हती. मात्र जिल्हापरिषदांच्या निवडणुका आल्यावर जोशीसर एकाएकी पहाटे त्याच्याकडे अवतरले.

“काय वसंता, कसा आहेस बाबा?” वसंत ध्यान लावून बसला होता. चुकूनमाकून गुल्हाने, कधी अण्णा इ. वगळता कोणीही त्याच्याकडे फिरकायचं नाही. त्याची तंद्री एकदम भंग पावली. जोशीसर घराच्या उंबरठ्यावरून, डोकावून पाहात होते.

“सर! अहो या, या ना आत.” वसंतानं त्यांचं स्वागत केलं. जोशीसर आत आले. वसंताच्या खोलीची अवस्था पाहून त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी भाव येऊन गेले असणार. वर करकरत घोंघावणारा पंखा काही उन्हाच्या झळांनी होणारी काहिली थांबवू शकत नव्हता. बसायला एक खुर्ची, आणि एक स्टूल. सर खुर्चीवर बसले.

“काय रे वसंता, इतक्या गर्मीत कसं ध्यान लावून बसता येतं तुला? काय रे ही घराची दशा…” वसंताला जे आधीच अवघडल्यासारखं होत होतं त्यात अजून भर पडली. त्यात परत त्यांच्याबरोबरचे पोलिस बाहेरच थांबले होते.

“आहे आपली गरिबाची झोपडी… तुम्ही कसं काय येणं केलंत सर?” वसंतानं चेहेऱ्यावर आत्यंतिक अजिजी आणून म्हटलं.

खरं तर वसंताला माहीत होतं. झेडपीच्या निवडणुका जवळ म्हटल्यावर लोक कसे त्याच्या घरी यायचे, त्याच्या आर्थिक/वैयक्तिक स्थितीबद्दल त्यांना अपार पुळका कसा दाटून यायचा, एकाएकी वसंत त्यांचा ‘आपला माणूस’, ‘वसंतभैया’ कसा होई. मात्र निवडणुकांचा प्रचार म्हटल्यावर वसंताला एक निराळाच उत्साह येई. नवीन कार्यकर्त्यांना प्रभाग वाटून देणं, पत्रके छापून घेणं, प्रत्येक प्रभागातल्या ‘कळीच्या’ माणसांशी बोलणं, त्यांना पटतील, असे मुद्दे काढून उमेदवारांना ते भाषणात अंतर्भूत करायला सांगणं इत्यादी कामं तो फक्त दोन वेळच्या जेवणावर करे. तरीही, इतके दिवस परिस्थितीचे चटके खाल्लेल्या त्याच्या मनाला जोशीसरांकडून अपेक्षा होत्या. पण, वर्षभर न फिरकलेले, जोशीसर घरी येऊन प्रचार करताहेत म्हटल्यावर त्याला सगळं कळून चुकलं.

“तुझ्यासारख्या, अगदी दोन्ही बाजू पारखून एका बाजूकडे राहिलेल्या हाडाच्या कार्यकर्त्याची आज आपल्या चळवळीला गरज आहे. आधी आपले मतभेद होते तरी तुझा निवडणुकांच्या वेळी काम करायचा झपाटा मला चांगलाच ठाऊक आहे वसंता. शिवाय आपल्या तरुण कार्यकर्त्यांसाठी एका अनुभवी कार्यकर्त्याचं मार्गदर्शन हवंच आहे.”

वसंताला ह्यापुढचं भाषण पाठ होतं. “हो, हो मी आहेच ना सर,” वगैरेची पखरण करत वसंतानं जोशीसरांना रवाना केलं. तिकडे शाखेतलं न बोलणं, अण्णांच्या वाढत्या कानगोष्टी इत्यादी असूनही दुसऱ्या दिवशी गुल्हाने आणि हळदणकर फ्लेक्स घेऊन आले. वसंत स्वत: उत्साहानं शाखा घेतो म्हटल्यावर आपसूकच पक्षाच्या प्रचाराची सगळीच धुरा त्याच्याच खांद्यावर होती. जणू वसंताचा होकार गृहीतच धरला होता प्रचारासाठी. वसंतही काही बोलला नाही. वसंतानं दोघांनाही फ्लेक्स वाटून दिले. देवळाच्या आजूबाजूच्या जागा स्वत: फ्लेक्स लावण्यासाठी ठेवल्या. तितकंच साधूला भेटता यावं म्हणून.

सगळे फ्लेक्स एका झोळीत बांधून वसंता ते देवळाजवळाच्या झाडावर टांगायला निघाला. देवळाकडे येता येता त्याला देवळाच्या भिंती बाहेरचं एक झाड दिसलं. त्यानं त्यावर फ्लेक्स लावायचा निर्णय घेतला. सगळे फ्लेक्स एकाच झोळीत टाकलेले, त्यामुळे लावायच्या फ्लेक्सची गुंडाळी काखोटीला मारून तो झाडावर चढला. उरलेले फ्लेक्स त्यानं झाडाला लागून उभे ठेवले. खिशात सुतळीचे तुकडे ठेवले होतेच. ते झाडाला बांधता बांधता त्याला खाली धप्पकन गुंडाळ्यांचं भेंडोळं पडल्याचा आवाज आला. तिथे झोपलेला एक कुत्रा त्या आवाजानं एकदम दचकून उठला. वसंताचा फ्लेक्स बांधून झाला असल्याने, त्यानंही खाली उडी मारली. त्यानं अधिकच बिचकलेला तो कुत्रा दुप्पट वेगानं पळाला. पळाला, तो त्या देवळातच शिरला. वसंतानं उरलेले फ्लेक्स उचलले आणि तो देवळात शिरला. देवळात कधी नव्हे ते अण्णा आलेले होते. अण्णा जोरजोरात रामरक्षा म्हणत होते. त्यांच्या पायाला त्या कुत्र्यानं दिली धडक. अण्णांची तंद्री भंग पावली आणि त्यांनी क्रोधानं खाली नजर टाकली. चिखलात पाय बुडवून आलेल्या त्या कुत्र्यानं त्यांच्या पांढऱ्या लेंग्यावर आणि देवळाच्या, इतक्या वर्षांनी रंग दिसलेल्या पांढऱ्या फरशीवर नक्षी उमटवली होती. पण त्या कुत्र्याला पकडावं तर कपडे आणि हातपाय अजूनच खराब झाले असते, म्हणून अण्णा फक्त पराकोटीच्या रागानं त्याच्याकडे पाहत राहिले. वसंतानं हे सगळं पाहिलं. नेमका साधू तिथे होता. साधूनं जाऊन त्या कुत्र्याला उचललं. अण्णांचा पारा चढला. ते ओरडले, “अरे, फेक त्या कुत्र्याला! घाल तो दंड त्याच्या पेकाटात! लेंगा खराब केलीन माझा…” साधूनं चुपचाप त्या कुत्र्याला उचललं आणि तो तिथून निघाला. अण्णा ओरडतच होते – “अरे, जरा पावित्र्याची पर्वा तुला? देऊळ चिखलानं बरबटलंन!” वसंतानं ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्वरित त्या साधूबरोबर कुत्र्याला बाहेर सोडून आला. अण्णा शिव्याशाप उद्गारत बाहेर पडले. साधूला ह्या सगळ्यानं काहीच फरक पडला नाही. त्याच्या धोतराला जरा चिखल लागला होता. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. त्यानं त्या कुत्र्याला खाली ठेवलं. वसंतानं फ्लेक्स उचलले, आणि निर्विकारपणे चालत घरी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी वसंत उठला. त्यानं बाहेर जाऊन पाहिलं. गुल्हाने, अण्णा इत्यादी बाहेर जमले होते. गावातले थोडे मोठे लोकही, काही फुटकळ गावकरी. नेमके जोशीसरही नाहीत. वसंताला कळेना काय चाललंय.

“काय झालंं? सगळे इथे कसे आज?” अण्णांनी त्याच्याकडे क्रुद्ध नजरेतून पाहिलं.

“अरे, माझं सोवळं काल नासवलंस आणि परत वर विचारतोएस काय इथे कसे म्हणून? अरे, ह्यानंच सोडलं ते कुत्रं आत! मी हाणणारच होतो, पण हा आला, सगळं देऊळभर नाचवलीन त्याला नि घेऊन गेला बगलेस धरुन!” वसंताला हळूहळू सगळं कळू लागलं. गावकऱ्यांचा रोष एका दिवसात गावातल्या सगळ्यात निरुपद्रवी प्राण्यावर आला होता. अर्थात ते पद्धतशीरपणे भडकावण्याचं काम कालच्या दिवसात अण्णांनी केलं होतं ह्यात शंकाच नव्हती. पण हे सगळं का, हे त्याला उमजत नव्हतं. अण्णांच्या साधारण जास्तच असलेल्या हिंदुत्ववादाला इतकं खतपाणी मिळावं कुठून की त्यांनी वसंताच्या मागे पडावं? वसंताला काहीच समजेना. काल तो सगळा उद्योग तर साधूनं केला होता! आपण फक्त उभे होतो तिथे… तरीही हे सगळे लोक आपल्यावर का खार खाऊन आहेत? जमलेल्या गर्दीच्या क्रुद्ध नजरा त्याला बघवेनात.
“मला काहीच कळत नाही… तो साधू होता ना तिथे अण्णा? त्यानंच-”

“गप ए! काय साधू साधू लावलाय कळत नाही… कोण साधू? काय साधू? तुलाच बाटवायचा होता धर्म म्हणून ही थेरं चाल्लीएत तुझी! आम्हाला काय कळत नाय? त्या जोश्याबरोबर बस्तो आणि आमच्या गप्पा ऐकून त्यांना सांगतो होय रे? बघतो तुला बरोबर… चला रेऽ!” अण्णा तरातर चालते झाले. त्यांच्याबरोबर सगळे बघेही. वसंत सुन्न झाला होता. साधूनं ते का केलं? ह्यात आपण कुठे गोवलो गेलो? त्याला काहीच कळेना. एकाएकी त्याला स्थलकालाचं नवीन भान आल्यासारखं झालं. तो तसाच उठला आणि तडक देवळाकडे निघाला. देवळाकडे जाताना लोक आपल्याकडे पाहून कुजबुजतायत, बोटं दाखवतायत ह्याचं त्याला भान नव्हतं. त्याला, आत्तापर्यंतच्या मनातल्या संग्रामातलं एक शल्य खुपत होतं. त्याचं उत्तर त्याला खुणावून गेलं होतं, आणि आता ते त्याला स्वस्थ बसू देणार नव्हतं.

इतक्यात जोशीसर दिसले. त्यानं एकदम त्यांना गाठलं. “सर, हे लोक बघा ना-”

“मला माहित्ये वसंता. हे करायला हवंच होतं, पण लोक इतक्यात एकदम इतक्या मोठ्या पॅरॅडाईम शिफ्टसाठी तयार नाहीएत. तुझी कंडिशन मला माहितीए. तू ते करणार होतासच, पण इतक्यात, आणि इतक्या कट्टर व्यक्तीबरोबर करशील असं वाटलं नव्हतं. आता गावाचा रोष तू स्वत:वर ओढवून घेतला आहेस, वसंता. मलाही लगेच तुझ्या बाजूनं बोलता येणार नाही, कारण तू केलंस ते सध्याच्या परिस्थितीत अयोग्य होतं. शिवाय आता निवडणुका येताहेत. पहिल्यांदाच गावाला वेगळं नेतृत्व मिळण्याची शक्यता होती, ती तू ह्या कामानं नाहीशी केलीस. पण अण्णा बाकी काही असलं तरी देवभोळे, धर्माभिमानी आहेत. त्यांच्या श्रद्धांवर असा सरळ जाऊन वार करणं सयुक्तिक नव्हतं. तू चुकलास वसंता. आता हे विष पचवून दाखवलंस तर तू खरा आमचा कार्यकर्ता. एरवी ही प्रत्येक लढाई आपली आपणच खेळायची असते! आता तू हे गाव सोडणंच योग्य. तुला निवडणुकीचं तिकीटच हवं असेल तर परत पाच वर्षांनी ये. अशीच काहीतरी, गाव सगळ्यावर एकमत होईल अशी एखादी घटना घडवून आण. मग बघ तुझे मार्ग खुले होतात की नाहीत ते…!”

ह्या परिस्थितीत ज्यांचा आधार मिळावा त्यांचं हे वक्तव्य ऐकून वसंताला एरवी भयानक चीड आली असती. पेटून उठला असता तो. पण त्याला आता एकाएकी सगळं कळल्यासारखं वाटत होतं. त्याला एकाएकी मोकळं वाटू लागलं होतं. छान. मनावरचं मळभ दूर सरल्यासारखं, एक जड मानेवरचं, फारा वर्षांचं जू बाजूला ठेवल्यासारखं.

साधूला पहिल्यांदा तो प्रश्न विचारला तेव्हा ज्या भावनेची एक लाट येऊन गेली होती, तो अख्खा समुद्र समोर होता. भकास असा. निस्तेज. ह्यापासूनच पळायचा इतकी वर्षं आपण प्रयत्न केला. तंद्रीत चालता चालता तो देवळापाशी आला. त्यानं पाहिलं. देवळात कोणीही नव्हतं. कालच्या कुत्र्याचे पाय तसेच उमटलेले होते. साधूनं एरवी ते लख्ख पुसून ठेवलं असतं. पण त्याचा मागमूसही नव्हता. पारावरच्या त्याच्या पथारीपाशी वसंत आला. त्यानं पहिल्यांदाच, त्या वस्तूंना हात लावायचं धारिष्ट्य केलं. एक सतरंजी. आईची आठवण म्हणून आपण आणलेली. एक सदरा आणि लेंगा असलेली झोळी. वसंताचीच. जपमाळ. बाबांची. दासबोध. पहिलं पान – कु. वसंत बिरेवार ह्यास मौजीबंधनानिमित्त – बापूराव आणि संघपरिवार.

शेवटी त्यानं झोळीखाली ठेवलेली ती वस्तू उचलली.

तडा गेलेल्या काचेआडून सावरकर, तीच करारी नजर शून्यात रोखून होते.

आणि वसंताचं मनही एक शून्य झालेलं होतं.

Leave a comment