काही ऑनलाईन पथ्ये

बरेच दिवस केंब्रिज ॲनॅलिटिका, फेसबुक आणि माहितीची चोरी ह्यावर प्रचंड चर्वितचर्वण सुरु आहे. सगळे हिरीरीने एकमेकांची अक्कल काढण्याची चढाओढ लावत आहेत. तंत्रजगताच्या प्रत्येक इव्हॉल्युशनरी स्टेजशी अगदी तोंडओळख असलेले; मिलेनिअल्सच्या आधीचे, केविलवाणेच असे- १९८०-२००० ह्या काळात जन्म झालेल्या लोकांचे स्ट्यांड वेगळे आहेत. आम्ही तो फक्त एकच लँडलाईन असलेल्या जगात वावरलेलो आहोत, पेजर, ब्लॅक ॲण्ड व्हाईट ठोकळा फोन, मग कलर फोन, मग मुजिक/क्यामरा/अँड्रॉईड/टच्चस्क्रीन फोन इ. प्रचंड झेपा साधारण २००३-४ नंतर प्रत्येक वर्षी पाहिलेल्या आहेत, हाताळलेल्या आहेत. हीच पिढी सध्या इंटरनेटवर ठाण मांडून आहे.

आणि आम्ही कन्फ्यूज्ड आहोत. सोशल मिडीआ वरून मिळणारी, आईवडलांच्या पिढीला न कळणारी ‘मजा’, आणि मिलेनीअल्स लोकांचा चालू असलेला अखंड बावळटपणा इ. मध्ये आम्ही फसलेलो आहोत.

असो. तर मी तरी ह्या पिढीतला आहे (अर्थातच) आणि मी काही पथ्यं माझ्या ऑनलाईन वावरात पाळतो. ती पाळल्यास तुमचा ऑनलाईन वावर तुमच्यासाठी आणि इतरांसाठी बराच सुखकर होतो असं माझं मत आहे. अर्थात, त्यानंतरही माहिती चोरी होऊ शकत असेल तर ती थांबवण्याचे मार्ग नाहीत इतकं मात्र नक्की.

ब्राऊझर:
सर्वप्रथम गुगल क्रोम हा मोठ्ठा डिस्प्ले असलेला, अतिशय वेगवान आणि अतिशय सोपा असा ब्राऊझर आहे. त्याखालोखाल मोझिल्ला फायरफॉक्सचा नंबर लागतो. मोझिल्लाचा डिस्प्ले अगदी अलिकडेच मोठा करण्यात आला. मोझिला मध्ये डेव्हलपर ऑप्शन्स हा प्रकार असल्यामुळे तो वेबदेवांमध्ये (Web Developers) लोकप्रिय आहे. तुम्ही खूप फ्री सॉफ्टवेअर वापरणारे असाल तर जवळपास प्रत्येक सॉफ्टवेअर एक वाईट, निरुपयोगी ॲड-ऑन किंवा टूलबार चिकटवून देते. तुमच्या इंस्टॉल्ड प्रोग्रॅम्समध्ये दिसणारे ‘टूलबार’ तुम्ही मुद्दामहून इंस्टॉल केलेले नसल्यास उडवून टाकावेत. इंटरनेट एक्स्पोअरर हा प्रचंड संथ आणि एक्स्टेंशन्सची सोय नसलेला एक्स्प्लोअरर आहे, जो फक्त क्रोम/फायरफॉक्स इन्स्टॉल करण्यासाठी वापरावा.
मोबाईलवर यूसी हा ब्राऊझर अजिबात वापरू नये.
कारणे:
१: त्याची इन्स्टॉलर एपीके फाईल बरेचदा व्हायरसयुक्त असते.
२: मध्यंतरी गुगल प्ले स्टोअरमधून काढला गेला होता.
३: ऑपेराच्या ग्राहकांनी त्यांना यूसीची चुकीच्या पद्धतीने जाहिरात दिसल्याबाबत मोठ्ठी तक्रार केली होती.
३: जाहिरातीच malicious असतात.
४: चायनीज आहे. 😛

आता वळूया इतर एक्स्टेन्शन्स-ॲडॉन्स कडे.
सर्वप्रथम, फोनवर ॲप-लॉक वापरावं. दुर्दैवाने कोणाच्या हातात स्क्रीन अनलॉक झालेला तुमचा फोन पडल्यास ते त्याला तुमचे खाजगी संदेश आणि इमेल वाचण्यापासून रोखू शकतं. प्ले स्टोअरवर उपलब्ध. स्क्रीन लॉक्ड ठेवावी.(पॅटर्न-पिन-पासवर्ड पैकी एक, मी पॅटर्न वापरतो, कारण मग फोन लोकल मध्ये पटकन एका हाताने अनलॉक करता येतो.) फोन चोरीला गेल्यास तो त्या माणसाने स्विच ऑफ करेपर्यंत तुम्हाला फोन करुन आवाजाचा वेध घ्यायला एखादं मिनीट मिळू शकतं.

१) ॲडब्लॉक:

कुठलाही ब्राऊझर वापरा, हे एक्स्टेंशन अतिशय उपयोगी आहे. क्रोम आणि फायरफॉक्स वर अतिशय उपयोगी आहे. गाणी/व्हिडीओ/फाईल्स डाऊनलोड करताना, वृत्तपत्रे वाचताना होणाऱ्या जाहिरातींमुळे रसभंग टाळण्यासाठी हा प्रकार जबरदस्त आहे. स्वस्त, लो-एंड, टॉरेंट वगैरे साईट्स वर जाहिरातींची सरबत्ती टाळण्यासाठी, बऱ्याच नकली लिंक्स, विचित्र संदेश आणि नवीन टॅब्स उघडणे हे प्रकार टाळण्यासाठी हे एक्स्टेंशन अतिशय उत्तम आहे. ह्या एक्स्टेंशनचा ‘टेरर’ एव्हढा आहे की महाराष्ट्र टाईम्सची वेबसाईट ॲडब्लॉक डिसेबल केल्याशिवाय बातम्या वाचू देत नाही.

२) गुगल लोकेशन सर्व्हिस:

ही ऑफ ठेवावी. ह्याच्यामुळे फोनची बॅटरी वाचते. माननीय आबा ह्यांच्या ह्या धाग्यात तुमच्या वावराचा आलेख/नकाशा गुगल कसा ठेवते ह्याबद्दल वाचायला मिळेल. ह्या सर्व्हिसचा तसा उपयोग फक्त तुम्ही हरवल्यास/एखादी जागा सापडत नसल्यास होतो. तुम्हाला नकाशे नीट,व्यवस्थित,अचूक वाचता येत असतील तर त्याचीही गरज नाही. फक्त मोबाईल डेटा(आंतरजाल) चालू करून तुम्ही सगळ्या गोष्टी नकाशावर आरामात पाहू शकता. ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, मॅकडिलीव्हरी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या (तुमच्या घराशी संबंध असलेल्या सगळ्याच) ॲप्स ही गुलोस सुरु ठेवायचा प्रचंड आग्रह करतात; जो तुम्ही टाळू शकता आणि तुमचे काम तसेच उरकू शकता. अर्थात ह्यात वेळ जातो, आणि लोकेशन सर्व्हिसने हे काम अक्षरश: तीन सेकंदांत होतं. एरवी ह्या कामांस एखाद दुसरे मिनीट जाते. हे इतकं अजाणतेपणी होतं की आपण कोणाकोणाला लोकेशन ॲक्सेस देऊन बसलोय हे आपल्याला विसरायला होतं. हे टाळण्यासाठी दरवेळी अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
सोय हवी की जोखीम हा तुमचा निर्णय आहे.

३) फेसबुक

शेवटी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आलोच. फेसबुकवर काय करावं हे सांगण्यासाठी हा लेख लिहीलेला नाही. फेसबुकने जे केलं त्याचं समर्थनही करायचा उद्देश नाही. पण फेसबुकवर बाकीच्यांना जळवण्याची जी अमर्याद चूष असते तिला जितका आवर घालू तितकंच बरं. आदूबाळ ह्यांच्या उपरिनिर्दिष्ट धाग्यात लिहील्याप्रमाणे आपला विदा आपणच गावभर हगून ठेवल्यानंतर तो चोरल्याची तक्रार करण्यात अर्थ नाही. हॉटेल्समध्ये चेक-इन करणं, फिल्लम पाहिल्यावर ते पहिले फेस्बुकावर टाकणं, इन्स्टाग्रामवर असाल तर अन्नपदार्थांचे फोटो टाकून त्या हॉटेलला टॅग वगैरे केल्यानंतर ‘मॉजा डाटा चोरलाऽ’ करून भोकाड पसरण्यात काहीही अर्थ नाही.
‘इथे बाकीच्यांना जळवण्याच्या चूषे’वर आक्षेप येतील हे माहितीए, पण, उदाहरणार्थ, तुमच्या तिसऱ्या नोकरीतल्या मित्रांबरोबर तुम्ही कुठल्या पॉश हॉटेलात गेलात हे शाळेतल्या नवीन नवीन फेस्बुकावर आलेल्या तुमच्या बाईंना कळवण्यामागे; हे सोडून दुसरं कितीही सयुक्तिक कारण असलं तरी ते मला पटणार नाहीये. इथेही तुम्ही नसता विदा फेसबुकावर सोडता. बरं, कधीतरी कुठल्या मित्राने ‘अरे त्यादिवशी का आला नाहीस’ केल्यास ‘मला जरा अंगात कणकण होती’ इ. उत्तर दिल्यास एक मित्र नक्कीच कमी होईल ह्याची खात्री बाळगा. कारण त्या मित्राने नक्कीच त्यादिवशी, तुमची फेसबुक भिंत पाहून ते स्वत:च्या मनात साठवलेलं असतं. खरोखर सुरेख आणि मनोरम्य पर्यटनस्थळ, एखादी डिश ह्यांची कधीतरी प्रकाशचित्रं टाकावीत. (माझे काही मित्र साप्ताहिक अंडा भुर्जी आणि मेवाड आइस्क्रीमचे फोटो टाकतात. इथे ‘दररोज’वर आक्षेप आहे.)
नॉन्सेन्स ग्रुप सरळ सोडा. फेसबुक ग्रुपांमध्ये फार काहीही राहिलेलं नाही. मी सभासद असलेल्या प्रत्येक ग्रुपवर काहीतरी स्पॅम (जाहिरातपर-बव्हांश नकली संदेश) येत असतोच किंवा फालतू आऊटडेटेड मीम्स वगैरे. ह्यात मराठी पुस्तकप्रेमी आणि खगोल मंडळ ह्यासारख्या (एकेकाळी दर्जेदार असलेल्या) ग्रुपचाही समावेश आहे. हे ग्रुप्स सोडायचे नसल्यास ‘अनफॉलो’ करावेत. सेल्फी टाकून गुड मॉर्निंग म्हणणाऱ्या ताया आणि गॉगल घालून दैनिक सेल्फी टाकणारे दादा इ. लोकांचा वीट आला असल्यास, आणि अनफ्रेंड करायची इच्छा नसल्यास अनफॉलो करावे. चाय पी लो.

४) व्हॉट्सॅप
सर्वप्रथम सेटींग्स- (तीन उभे बिंदू-) डेटा स्टोरेज- मध्ये जाऊन सर्व मिडीआ फाईल्सचं ऑटो-डाऊनलोड बंद ठेवावं. म्हणजे खालील प्रकार क मधून मेमरी भरत जाण्याची वारंवारिता कमी होते.

क) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुड मॉर्निंग आणि सुप्रभात संदेश पाठवणं सोडा. शिवाय सकाळी मौलिक उपदेश/देवांची चित्रे पाठवल्यास तुमची गणना सरळ पन्नाशी पार अंकल/आंटी मध्ये होते इतकं लक्षात ठेवा, ज्यांच्या आयुष्यात हे असे संदेश पाठवणं हे एक थ्रिल असतं. असे खास संदेश बनवणारी शेअरचॅट वगैरे ॲप्स उपलब्ध आहेत. वापरु नयेत. त्यांची सिग्नेचर टेक्स्ट (मेसेज सेन्ट फ्रॉम शेअरचॅट) खाली आल्यास तुमची ‘लोनली अंकल/आंटी’मध्ये गणना होते. ही त्याहून खालची पायरी आहे.

ख) वेळोवेळी इंटर्नल स्टोरेज मध्ये जाऊन, Whatsapp-Media-Sent- ह्या मार्गाने गेल्यास प्रत्येक मिडीआ टाईपचा एक फोल्डर दिसेल. त्यात जाऊन सगळ्या फाईल्स डिलीट करत रहा. ह्या फाईल्स तुम्ही ‘पाठवलेल्या’ आहेत. जर एखादा व्हिडीओ तुम्ही पाच लोकांना फॉरवर्ड केला, तर त्याच्या पाच नकला तुम्हांला त्यात दिसतील. म्हणजे साधारण ५ एमबीची फाईल, फक्त पाच लोकांना केलेल्या फॉरवर्ड्समुळे २५ एमबीची होते. अशा आठवड्याला दहा फाईल गणल्या तर २५० एमबी. फोटो, वर दिलेला प्रकार क मध्ये असाल तर त्या इमेजेस ह्यांचेही साधारण ३० एमबी दिवसाला होतात. ह्या सगळ्याच्या सगळ्या सरळ डिलीट कराव्यात. ह्या फोल्डर्समध्ये असलेल्या मिडीआ फाईल्स तुमच्या फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत. म्हणजेच, तुमचं व्हॉट्सॅप फोनची मेमरी क्षणोक्षणी व्यापत असतं. ह्या कामासाठी फाईल एक्स्प्लोअरर ॲप असणं गरजेचं आहे. बऱ्याच फोन्समध्ये अंतर्भूत असतं, नसल्यास प्ले स्टोअरवर फाईल मॅनेजर असंख्य उपलब्ध आहेत.
ह्या बहुतेक तुम्हाला कोणाकडून तरी आलेल्या असल्यामुळे त्या तुमच्या Whatsapp-Media- ह्या फोल्डरात मिळण्याची शक्यता आहेच. त्या तुम्हाला गॅलरीत दिसू शकतात आणि डिलीटही करता येतात.

ग) रीड रिसीट आणि लास्ट सीन
रीड रिसीट म्हणजे दोन निळ्या ‘टिक्स’ जे संदेश तुम्ही वाचला असल्याची पोचपावती देणाऱ्याला पाठवतात. ह्या बंद ठेवाव्यात कारण ‘केव्हाचा मेसेज केलाय आणि आता रिप्लाय केला’ छाप प्रकारांना तोंड द्यावं लागत नाही. लास्ट सीनही बंद ठेवतो कारण ‘ऑनलाईन होता आणि माझा मेसेज बघायला वेळ नाही’ इत्यादी प्र.तों.द्या.ला.ना. ह्यात तुमच्या रक्तात दुसऱ्यांना असे संदेश न पाठवण्यापुरतं बॅडॅस्य भिनलेलं असलं पाहिजे.

घ) बॅकप आणि चॅट डिलीट
तुमचे एकतरी अगदी बिनकामाच्या मंडळीचा ग्रुप असणार. तो साप्ताहिक/दैनिक ‘क्लिअर चॅट’ करत रहावा. जुने चॅट्स, महत्त्वाची माहिती/गॉसिप/पुरावे नसल्यास फटाफट डिलीट मारावेत. एखाद्या माणसाबरोबर केलेले चॅट अतिशय उपयोगाचे असेल, तर ‘इमेल चॅट’चा पर्याय आहे तो वापरावा. शिवाय पुरावा म्हणून हवा असल्यास स्क्रीनशॉट काढावेत आणि त्या फाईल्स गुगल ड्राईव्हवर चढवाव्यात. फोन तुम्ही दररोज ज्यावेळी घरी असता त्यावेळी ऑटो बॅकपला ठेवावा, म्हणजे फोन बदलायचा प्रसंग आल्यास महत्त्वाच्या गप्पा जशाच्या तशा मिळतात. वरील सगळ्या कृतींमुळे ह्या बॅकपची साईझ १००एमबी पेक्षा कमी होते आणि बॅकप पटापट होतो. शिवाय फोन बदलल्यानंतर तो पटकन डाऊनलोडही होतो.

धागा माहितीपर असला तरी एक चर्चाविषयच आहे. मते माझी वैयक्तिक आहेत. बऱ्याच गोष्टी अव्यवहार्य वाटायचा संभव आहे. तुम्हालाही अशा क्लृप्त्या माहित असल्यास डकवाव्यात.

पूर्वप्रकाशित: ऐसीअक्षरे

वसंत बिरेवारचा दुसरा दिवस – ३

भाग ३ – अंतिम

त्यांनी गाय मारली म्हणून…

हं! तो अजून एक वादाचा विषय. राहू दे. सावरकर-सावरकर करणाऱ्या कोणालाच त्यांचे विचार झेपणारे नाहीत. सोयीचे गांधी क्वोट करता येतात तसेच सावरकरही सोयीचेच क्वोट केले जातात. असो. आपण आपली शाखा घ्यावी. बौद्धिक घेणं आपलं काम नाही. बापूरावांनंतर बौद्धिक घेणारं जबाबदार माणूस नाही. सांगितलं पाहिजे, शाखा सुरू झालीये, बौद्धिकासाठी व्यक्ती पाठवा. साधूलाच विचारावं काय? पण साधू आपल्याच दुनियेत. काहीतरी व्यवहार्य विचारायला जावं तर तो दोन अभंग फेकून आपल्याला गप्प करणार हे आपल्याला माहिताहे. तरी वसंतानं मनाचा धडा करून एकदा विचारलंच साधूला. खरं तर वसंताला साधूही बराच हिंदुत्ववादी वाटला होता. अभक्ष्य भक्षण नाही. पण गावात भिक्षा मागायला जायचा तेव्हा जे अक्षरश: काय मिळेल ते खायचा. लोकही तसलं काही त्याला द्यायच्या फंदात पडायचे नाहीत. शुभ्र दाढी वाढवलेला साधू आणि त्याच्या तोंडी अखंड असणारे अभंग ऐकून त्याच्याभोवती एक वलय असल्याचा भास व्हायचा. लोकांना थोडा आदरयुक्त दराराच होता त्याच्याबद्दल. हे प्रश्न तरी ऐकून साधू पेटून उठेल, आणि काहीतरी सडेतोड उत्तर देईल ही वसंताची अपेक्षा होती.

कसचं काय.

“विद्वान आहेस!” उद्गारुन त्यानं शाबासकीच दिली आपल्याला. मन काय भन्नाट गांगरलं होतं… कुठेतरी, छान, मोकळं वाटत होतं. काहीतरी, बरीच वर्षं मनावर ठेवलेलं जू क्षणभर काढून ठेवलंय असं वाटून गेलेलं. पण परिस्थितीची जाणीवही झाली लवकरच. साधूनं वेड्यात काढलं असावं बहुतेक आपल्याला. पण तो इतकंच म्हणाला- “तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदु:ख जीव भोग पावे!”
आणि मग गप्पच झाला तो एकदम. साधू हा इसम बापूराव, जोशीसर, कांबळे, शिंदे, अण्णा ह्यांच्यापेक्षा कैकपटीनं जास्त व्यवहारी आणि पुस्तकी ज्ञान बाळगून आहे असं आपल्याला नेहमी वाटायचं. ते का, हे कधी कळलं नाही. मध्यंतरी ते गायप्रकरण उद्भवलेलं तेव्हाही साधू गप्प होता. श्रेष्ठींकडून आदेश आलेले नसले तरीही अण्णा, गुल्हाने, हळदणकर इ. पेटलेले बरेच. काय तरी बघून येतात त्या युट्यूबावर आणि उगीच भडकलेले राहतात सदैव. ते यूट्यूब अजून एक. एकदा तुम्ही ते धर्माधारितच काहीतरी बघायला लागलात की फक्त त्याच धर्तीचे व्हिडीओ दाखवले जातात. हे व्हॉट्सॅपवरचं पब्लिकही तसंच. एकाला साधा विवेकानंदांचा – साध्य आणि साधनेतला उतारा पाठवला तर लगेच दर दिवशी आहे सकाळी सकाळी हनुमान चालिसातलं विज्ञान आणि आपल्या परंपरांतलं विज्ञान. एकदा साधूला हे दाखवलं होतं वसंतानं उत्साहात. त्याचा काही प्रतिसाद नाही. मग एकदा त्याला स्वच्छ प्रश्नच टाकलेला, की तुला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल. एरवी तुकोबा, रामदास, ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेबद्दल निर्झरासारखी ओघवणारी त्याची वाणी हे प्रश्न आले की एकदम गप्प व्हायची. का कोण जाणे, सदा प्रसन्न असणारा साधू एकदम गप्प गप्प व्हायचा. एखादा अभंग वगैरे म्हणत राहायचा. वसंत बराच वेळ ते ऐकत बसे, आणि कंटाळा आला की घरी जाई. देवळात तसंही कोणी फिरकायचं नाहीच.

मग आल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका.

एरवी निवडणुका म्हटलं की वसंताच्या अंगात दहा हत्तींचं बळ येई. पण आजकाल त्याला त्यातही रस उरलेला नव्हता. पक्षाकडून कोणी ‘क्ष’ उभे राहिले होते. वसंताला त्यांचं नाव जाणून घ्यायची गरज भासली नाही. विरुद्ध पक्षाकडून कोणी उभं राहण्याची चिन्हं नव्हती. मात्र जिल्हापरिषदांच्या निवडणुका आल्यावर जोशीसर एकाएकी पहाटे त्याच्याकडे अवतरले.

“काय वसंता, कसा आहेस बाबा?” वसंत ध्यान लावून बसला होता. चुकूनमाकून गुल्हाने, कधी अण्णा इ. वगळता कोणीही त्याच्याकडे फिरकायचं नाही. त्याची तंद्री एकदम भंग पावली. जोशीसर घराच्या उंबरठ्यावरून, डोकावून पाहात होते.

“सर! अहो या, या ना आत.” वसंतानं त्यांचं स्वागत केलं. जोशीसर आत आले. वसंताच्या खोलीची अवस्था पाहून त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी भाव येऊन गेले असणार. वर करकरत घोंघावणारा पंखा काही उन्हाच्या झळांनी होणारी काहिली थांबवू शकत नव्हता. बसायला एक खुर्ची, आणि एक स्टूल. सर खुर्चीवर बसले.

“काय रे वसंता, इतक्या गर्मीत कसं ध्यान लावून बसता येतं तुला? काय रे ही घराची दशा…” वसंताला जे आधीच अवघडल्यासारखं होत होतं त्यात अजून भर पडली. त्यात परत त्यांच्याबरोबरचे पोलिस बाहेरच थांबले होते.

“आहे आपली गरिबाची झोपडी… तुम्ही कसं काय येणं केलंत सर?” वसंतानं चेहेऱ्यावर आत्यंतिक अजिजी आणून म्हटलं.

खरं तर वसंताला माहीत होतं. झेडपीच्या निवडणुका जवळ म्हटल्यावर लोक कसे त्याच्या घरी यायचे, त्याच्या आर्थिक/वैयक्तिक स्थितीबद्दल त्यांना अपार पुळका कसा दाटून यायचा, एकाएकी वसंत त्यांचा ‘आपला माणूस’, ‘वसंतभैया’ कसा होई. मात्र निवडणुकांचा प्रचार म्हटल्यावर वसंताला एक निराळाच उत्साह येई. नवीन कार्यकर्त्यांना प्रभाग वाटून देणं, पत्रके छापून घेणं, प्रत्येक प्रभागातल्या ‘कळीच्या’ माणसांशी बोलणं, त्यांना पटतील, असे मुद्दे काढून उमेदवारांना ते भाषणात अंतर्भूत करायला सांगणं इत्यादी कामं तो फक्त दोन वेळच्या जेवणावर करे. तरीही, इतके दिवस परिस्थितीचे चटके खाल्लेल्या त्याच्या मनाला जोशीसरांकडून अपेक्षा होत्या. पण, वर्षभर न फिरकलेले, जोशीसर घरी येऊन प्रचार करताहेत म्हटल्यावर त्याला सगळं कळून चुकलं.

“तुझ्यासारख्या, अगदी दोन्ही बाजू पारखून एका बाजूकडे राहिलेल्या हाडाच्या कार्यकर्त्याची आज आपल्या चळवळीला गरज आहे. आधी आपले मतभेद होते तरी तुझा निवडणुकांच्या वेळी काम करायचा झपाटा मला चांगलाच ठाऊक आहे वसंता. शिवाय आपल्या तरुण कार्यकर्त्यांसाठी एका अनुभवी कार्यकर्त्याचं मार्गदर्शन हवंच आहे.”

वसंताला ह्यापुढचं भाषण पाठ होतं. “हो, हो मी आहेच ना सर,” वगैरेची पखरण करत वसंतानं जोशीसरांना रवाना केलं. तिकडे शाखेतलं न बोलणं, अण्णांच्या वाढत्या कानगोष्टी इत्यादी असूनही दुसऱ्या दिवशी गुल्हाने आणि हळदणकर फ्लेक्स घेऊन आले. वसंत स्वत: उत्साहानं शाखा घेतो म्हटल्यावर आपसूकच पक्षाच्या प्रचाराची सगळीच धुरा त्याच्याच खांद्यावर होती. जणू वसंताचा होकार गृहीतच धरला होता प्रचारासाठी. वसंतही काही बोलला नाही. वसंतानं दोघांनाही फ्लेक्स वाटून दिले. देवळाच्या आजूबाजूच्या जागा स्वत: फ्लेक्स लावण्यासाठी ठेवल्या. तितकंच साधूला भेटता यावं म्हणून.

सगळे फ्लेक्स एका झोळीत बांधून वसंता ते देवळाजवळाच्या झाडावर टांगायला निघाला. देवळाकडे येता येता त्याला देवळाच्या भिंती बाहेरचं एक झाड दिसलं. त्यानं त्यावर फ्लेक्स लावायचा निर्णय घेतला. सगळे फ्लेक्स एकाच झोळीत टाकलेले, त्यामुळे लावायच्या फ्लेक्सची गुंडाळी काखोटीला मारून तो झाडावर चढला. उरलेले फ्लेक्स त्यानं झाडाला लागून उभे ठेवले. खिशात सुतळीचे तुकडे ठेवले होतेच. ते झाडाला बांधता बांधता त्याला खाली धप्पकन गुंडाळ्यांचं भेंडोळं पडल्याचा आवाज आला. तिथे झोपलेला एक कुत्रा त्या आवाजानं एकदम दचकून उठला. वसंताचा फ्लेक्स बांधून झाला असल्याने, त्यानंही खाली उडी मारली. त्यानं अधिकच बिचकलेला तो कुत्रा दुप्पट वेगानं पळाला. पळाला, तो त्या देवळातच शिरला. वसंतानं उरलेले फ्लेक्स उचलले आणि तो देवळात शिरला. देवळात कधी नव्हे ते अण्णा आलेले होते. अण्णा जोरजोरात रामरक्षा म्हणत होते. त्यांच्या पायाला त्या कुत्र्यानं दिली धडक. अण्णांची तंद्री भंग पावली आणि त्यांनी क्रोधानं खाली नजर टाकली. चिखलात पाय बुडवून आलेल्या त्या कुत्र्यानं त्यांच्या पांढऱ्या लेंग्यावर आणि देवळाच्या, इतक्या वर्षांनी रंग दिसलेल्या पांढऱ्या फरशीवर नक्षी उमटवली होती. पण त्या कुत्र्याला पकडावं तर कपडे आणि हातपाय अजूनच खराब झाले असते, म्हणून अण्णा फक्त पराकोटीच्या रागानं त्याच्याकडे पाहत राहिले. वसंतानं हे सगळं पाहिलं. नेमका साधू तिथे होता. साधूनं जाऊन त्या कुत्र्याला उचललं. अण्णांचा पारा चढला. ते ओरडले, “अरे, फेक त्या कुत्र्याला! घाल तो दंड त्याच्या पेकाटात! लेंगा खराब केलीन माझा…” साधूनं चुपचाप त्या कुत्र्याला उचललं आणि तो तिथून निघाला. अण्णा ओरडतच होते – “अरे, जरा पावित्र्याची पर्वा तुला? देऊळ चिखलानं बरबटलंन!” वसंतानं ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्वरित त्या साधूबरोबर कुत्र्याला बाहेर सोडून आला. अण्णा शिव्याशाप उद्गारत बाहेर पडले. साधूला ह्या सगळ्यानं काहीच फरक पडला नाही. त्याच्या धोतराला जरा चिखल लागला होता. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. त्यानं त्या कुत्र्याला खाली ठेवलं. वसंतानं फ्लेक्स उचलले, आणि निर्विकारपणे चालत घरी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी वसंत उठला. त्यानं बाहेर जाऊन पाहिलं. गुल्हाने, अण्णा इत्यादी बाहेर जमले होते. गावातले थोडे मोठे लोकही, काही फुटकळ गावकरी. नेमके जोशीसरही नाहीत. वसंताला कळेना काय चाललंय.

“काय झालंं? सगळे इथे कसे आज?” अण्णांनी त्याच्याकडे क्रुद्ध नजरेतून पाहिलं.

“अरे, माझं सोवळं काल नासवलंस आणि परत वर विचारतोएस काय इथे कसे म्हणून? अरे, ह्यानंच सोडलं ते कुत्रं आत! मी हाणणारच होतो, पण हा आला, सगळं देऊळभर नाचवलीन त्याला नि घेऊन गेला बगलेस धरुन!” वसंताला हळूहळू सगळं कळू लागलं. गावकऱ्यांचा रोष एका दिवसात गावातल्या सगळ्यात निरुपद्रवी प्राण्यावर आला होता. अर्थात ते पद्धतशीरपणे भडकावण्याचं काम कालच्या दिवसात अण्णांनी केलं होतं ह्यात शंकाच नव्हती. पण हे सगळं का, हे त्याला उमजत नव्हतं. अण्णांच्या साधारण जास्तच असलेल्या हिंदुत्ववादाला इतकं खतपाणी मिळावं कुठून की त्यांनी वसंताच्या मागे पडावं? वसंताला काहीच समजेना. काल तो सगळा उद्योग तर साधूनं केला होता! आपण फक्त उभे होतो तिथे… तरीही हे सगळे लोक आपल्यावर का खार खाऊन आहेत? जमलेल्या गर्दीच्या क्रुद्ध नजरा त्याला बघवेनात.
“मला काहीच कळत नाही… तो साधू होता ना तिथे अण्णा? त्यानंच-”

“गप ए! काय साधू साधू लावलाय कळत नाही… कोण साधू? काय साधू? तुलाच बाटवायचा होता धर्म म्हणून ही थेरं चाल्लीएत तुझी! आम्हाला काय कळत नाय? त्या जोश्याबरोबर बस्तो आणि आमच्या गप्पा ऐकून त्यांना सांगतो होय रे? बघतो तुला बरोबर… चला रेऽ!” अण्णा तरातर चालते झाले. त्यांच्याबरोबर सगळे बघेही. वसंत सुन्न झाला होता. साधूनं ते का केलं? ह्यात आपण कुठे गोवलो गेलो? त्याला काहीच कळेना. एकाएकी त्याला स्थलकालाचं नवीन भान आल्यासारखं झालं. तो तसाच उठला आणि तडक देवळाकडे निघाला. देवळाकडे जाताना लोक आपल्याकडे पाहून कुजबुजतायत, बोटं दाखवतायत ह्याचं त्याला भान नव्हतं. त्याला, आत्तापर्यंतच्या मनातल्या संग्रामातलं एक शल्य खुपत होतं. त्याचं उत्तर त्याला खुणावून गेलं होतं, आणि आता ते त्याला स्वस्थ बसू देणार नव्हतं.

इतक्यात जोशीसर दिसले. त्यानं एकदम त्यांना गाठलं. “सर, हे लोक बघा ना-”

“मला माहित्ये वसंता. हे करायला हवंच होतं, पण लोक इतक्यात एकदम इतक्या मोठ्या पॅरॅडाईम शिफ्टसाठी तयार नाहीएत. तुझी कंडिशन मला माहितीए. तू ते करणार होतासच, पण इतक्यात, आणि इतक्या कट्टर व्यक्तीबरोबर करशील असं वाटलं नव्हतं. आता गावाचा रोष तू स्वत:वर ओढवून घेतला आहेस, वसंता. मलाही लगेच तुझ्या बाजूनं बोलता येणार नाही, कारण तू केलंस ते सध्याच्या परिस्थितीत अयोग्य होतं. शिवाय आता निवडणुका येताहेत. पहिल्यांदाच गावाला वेगळं नेतृत्व मिळण्याची शक्यता होती, ती तू ह्या कामानं नाहीशी केलीस. पण अण्णा बाकी काही असलं तरी देवभोळे, धर्माभिमानी आहेत. त्यांच्या श्रद्धांवर असा सरळ जाऊन वार करणं सयुक्तिक नव्हतं. तू चुकलास वसंता. आता हे विष पचवून दाखवलंस तर तू खरा आमचा कार्यकर्ता. एरवी ही प्रत्येक लढाई आपली आपणच खेळायची असते! आता तू हे गाव सोडणंच योग्य. तुला निवडणुकीचं तिकीटच हवं असेल तर परत पाच वर्षांनी ये. अशीच काहीतरी, गाव सगळ्यावर एकमत होईल अशी एखादी घटना घडवून आण. मग बघ तुझे मार्ग खुले होतात की नाहीत ते…!”

ह्या परिस्थितीत ज्यांचा आधार मिळावा त्यांचं हे वक्तव्य ऐकून वसंताला एरवी भयानक चीड आली असती. पेटून उठला असता तो. पण त्याला आता एकाएकी सगळं कळल्यासारखं वाटत होतं. त्याला एकाएकी मोकळं वाटू लागलं होतं. छान. मनावरचं मळभ दूर सरल्यासारखं, एक जड मानेवरचं, फारा वर्षांचं जू बाजूला ठेवल्यासारखं.

साधूला पहिल्यांदा तो प्रश्न विचारला तेव्हा ज्या भावनेची एक लाट येऊन गेली होती, तो अख्खा समुद्र समोर होता. भकास असा. निस्तेज. ह्यापासूनच पळायचा इतकी वर्षं आपण प्रयत्न केला. तंद्रीत चालता चालता तो देवळापाशी आला. त्यानं पाहिलं. देवळात कोणीही नव्हतं. कालच्या कुत्र्याचे पाय तसेच उमटलेले होते. साधूनं एरवी ते लख्ख पुसून ठेवलं असतं. पण त्याचा मागमूसही नव्हता. पारावरच्या त्याच्या पथारीपाशी वसंत आला. त्यानं पहिल्यांदाच, त्या वस्तूंना हात लावायचं धारिष्ट्य केलं. एक सतरंजी. आईची आठवण म्हणून आपण आणलेली. एक सदरा आणि लेंगा असलेली झोळी. वसंताचीच. जपमाळ. बाबांची. दासबोध. पहिलं पान – कु. वसंत बिरेवार ह्यास मौजीबंधनानिमित्त – बापूराव आणि संघपरिवार.

शेवटी त्यानं झोळीखाली ठेवलेली ती वस्तू उचलली.

तडा गेलेल्या काचेआडून सावरकर, तीच करारी नजर शून्यात रोखून होते.

आणि वसंताचं मनही एक शून्य झालेलं होतं.

वसंत बिरेवारचा दुसरा दिवस – २

भाग २

अण्णा कधीकधी वसंताची त्यांनी चांगलीच हजेरी घ्यायचे – “अरे, त्या धर्मबुडव्यांच्या नादाला नको लागूस, नको लागूस, म्हणून कित्तीदा बोललो, कधी येणार डोकं ताळ्यावर तुझं? दररोज बघतोस ना काय पाठवतो मी ते? अरे, त्यांना नाहीत उद्योग! स्वत:च्या पोरांना लावून दिलंन् परदेशास, नी आपल्याला इकडे उपदेश करतात होय रे! ते काही नाही, तूही धर्मबुडवाच झालाएस आजकाल!” खरंतर इतके दिवस नेटानं शाखा घेऊन, जवळपास दहा तरी निवडणुकांमध्ये एकही पैसा न करता प्रचार करणं, संघाचा प्रचार करणे ही कामं, काहीही मोबदला न घेता करणं ह्याचा इतकाच मोबदला मिळावा! वसंताला एरवी फार वाईट वाटलं असतं पण त्याला सध्या हे अपेक्षितच होतं. स्वत:चं डोकं वापरलं की व्यवस्थेचा विरोध हा होणारच हे त्याला अनुभवांती कळून चुकलं होतं. कधी कधी अण्णांचा फार राग यायचा. जोशीसरांचे शब्द आठवायचे – तुम्ही इतकी सोवळी पाळून, झाडांभोवती प्रदक्षिणा घालून, षोडशोपचारे पूजांवर पूजा करून आणि सांगून काय साध्य केलंत? तुमचा मुलगा गेला का हम्रिकेत? तेच तुमचं अंतिम ध्येय ना तसंही? धर्म आला का मदतीला तिथे? असो. ते बोलले म्हणून आपण मर्यादांचं उल्लंघन करणं योग्य नाही. येईल. एक दिवस आपलाही येईल. दाखवून देऊ. तरीही, संघाचे लोक उगा बुद्धिभेद करायचे नाहीत. ‘ते’ जोशीसर आणि इतर लोक मात्र त्याच्या शाखा घेणं, दररोज देवळात जाणं ह्यावर भलतेच वादविवाद करायचे. सगळ्याचा सारांश थोडक्यात अजून कशी अक्कल आलेली नाही हाच असायचा. त्याला ‘अंत:चक्षू उघडणं, नवे विचार समजून घ्यायला वेळ जावा लागणं’ वगैरे गोड गोड शब्दांत अक्कलच काढली जायची. वसंता कंटाळून ह्या सगळ्याबाबत विचार करायचा. खरं तर वसंताचंही ‘स्वत:चं असं मत’ आजकालच बनलं होतं. तेही नीट बनलं होतं का, ह्याचं उत्तर त्याच्यापाशी नव्हतं. सगळ्यापासून अलिप्त रहावं, आपलं काम करत रहावं हे त्याला दररोज वाटत असलं तरी संघ आणि जोशीसर ह्या दोन्ही जबाबदाऱ्यांतून एकाएकी मुक्त होण्याची त्याची हिंमत नव्हती. अण्णांना तो जोशीसरांच्या घरातल्या सभांना जातो म्हटल्यापासून वसंतावर खास राग होता. त्यांनी बोलणंच टाकलं जवळपास त्याच्याशी. गुल्हाने, हळदणकर, कांबळे इत्यादी आणि अण्णा कानगोष्टी करू लागले. सगळे शाखेवर यायचे, पण वसंताशी अवांतर बोलणं बंद. जेवढ्यास तेवढं. वसंताला ह्याचाही फरक पडेनासा झाला होता.

वसंताला क्षणोक्षणी संघाच्या बैठकी आठवायच्या. कसं रोम-रोम चेतवून उठणारी बौद्धिकं असायची. तिथे फार व्यक्तिकेंद्रित विचाराला वाव नसायचा. प्रात:स्मरणीय, पूजनीय ह्यांच्यातून जे विचारसरणीला पोषक तेच विचार नेमके गाळून उचलले जायचे, हे वसंताला केव्हाच कळून चुकलं होतं. त्याच्या उदासीनतेमागे हेच एक मोठं कारण होतं. बापूरावांनी काढायला लावलेली सावरकरांची तसबीर त्यानं व्यवस्थित पुसून परत टांगली होती. सावरकरांच्या अतोनात हालअपेष्टांमधून, खिळ्यानं ‘कमला’सारखं दर्जेदार काव्य लिहीणं, हे आदर्श लहानपणापासून डोळ्यासमोर असल्यानं त्यानं कधीच अशा अवस्थेबद्दल तक्रार केली नव्हती. पण, इतक्या सुधारणावादी, आदर्शवादी, बुद्धिवादी लोकांकडून त्याला जास्त अपेक्षा होत्या. पण वेगळं वेगळं म्हणता म्हणता, अंतस्थ प्रवृत्ती सारख्याच आहेत हे त्याला आता कळून चुकलं होतं. एका व्याख्यानात एक ‘अ’ सर एका ‘ब’ बाईंचे विचार कसे समर्पक आहेत, आणि कसं मनातलं बोलून जातात इत्यादी म्हणायचे. पुढच्या परिसंवादात त्या ‘ब’ बाई अजून एका ‘क’ सरांच्या ‘लेखानं भारावून जाऊन स्फुरलेली कविता’ सादर करायच्या. मग हे ‘क’ सर पुढच्या व्याख्यानात परत पहिल्या ‘अ’ सरांच्याच मार्गदर्शनाखाली आपली विचारसरणी कशी घडत गेली हे म्हणायचे. संघाकडे स्वत:ची सुप्रतिष्ठित, कर्तृत्वामुळे वादातीत अशी ‘लोकप्रतीकं’ होतीच. पण ह्या लोकांनी तशीच पहिले ‘घडवायला’ सुरुवात केलेली होती. म्हणजे मूलत: विचारपद्धतीवर टीका करून तीच अंगिकारायची, पण स्वत:चा मात्र बुद्धिवादी म्हणून प्रचार करवून घ्यायचा ह्या प्रवृत्तीचा त्याला कंटाळा येऊ लागला.

हे जवळपास रोजचंच झालं होतं. दोन्ही बाजूंचे परस्परविरोधी विचार सांगणारे दोन वसंत त्याच्या मनात उभे रहायचे, आणि तुटून पडायचे अक्षरश: एकमेकांवर. मुख्य म्हणजे, दररोज हजारो संदेश, व्हिडिओ इत्यादी पाहून वसंताला इतकं कळलं होतं की फक्त भावनांशी खेळण्यामध्ये दोन्ही बाजूंना रस आहे. संघ कायम धर्मभावनेला खतपाणी घालत आला आहे, आणि हे लोक म्हणे लोकांच्या तर्ककुशलतेला खतपाणी घालतात. स्वत:च्या तर्काशी निष्ठा ठेवणं, आपण तर्कशुद्धच राहणं हीही एक मानवी भावनाच नाही का? आणि काय मिळालंय हे तर्कशुद्ध राहून? दिवसभर जरा येता जाता रामनाम घेतलं तर किती तरी कामं इतकी सहज होतात, ती नुसती करताना वेळ खायला उठतो. देव ह्या ह्यासाठीच असावा. ‘फिरी पिकावर येणाऱ्या’ मनाला एक शीड म्हणून. त्याचा धंदा बराच झाला तो सोडा. धंदा कशात नाही? हे लोक काय धंदा मांडून बसले नाही आहेत? तुकडोजी, विनोबाजींची चरित्र वसंतानं लहानपणी वाचली होती. ‘मा फलेषु कदाचन’ कर्म करणारे जवळपास ह्या जगात आपणच राहिलो आहोत, आणि आपल्यासारखे गुल्हाने वगैरे नादान लोक असं काहीतरी त्यानं अनुमान काढलं होतं.

गुल्हानेही एकदम कुठे अमेरिकेत गेलेला तो परत आला. कायतरी तिकडचा साहेब बदलला, तो म्हणे सगळ्यांना पळवणार. म्हटल्यावर गुल्हाने निमूटपणे तिकडचा गाशा गुंडाळून आधीच निघून आला. खरंतर एमेशीआयटीच्या शिंदेबाबापेक्षा गुल्हानेनंच वसंताला फेसबुक, इन्स्टाग्राम कसं वापरायचं हे जास्त दाखवलं होतं. त्या MSCIT च्या कोर्समध्ये वसंताला पैकीच्या पैकी मार्क मिळालेले. नंतर मात्र पेपरात येणारं ‘सेल्फी, हॅशटॅग, ट्रेंडींग, मीम्ज, ट्वीट्स’ आदी शब्द डोक्यावरून जायला लागले तसे त्यानं हे सगळं काये, असं शिंदेला विचारलं, तेव्हा शिंदे म्हणालेला की “हे समदं पोरांना माहिती, मला आयड्या नाय. मी फक्त वॉट्सॅप आनि पिच्चर बगतो.” मग गुल्हाने आणि त्याच्या पोरानं एकदा वसंताचा चांगला कोर्सचा घेतला छोटेखानी. सेल्फी कसे काढतात, स्नॅपचॅट काय अस्तं, इन्स्टाग्राम काय अस्तं… वसंताला एकदम जादूची कांडी हातात आल्याचा भास झाला होता. साधारण पाच वर्षांपूर्वी प्रचार कसा होता, आणि आता काय भारी झालाय! घरोघर हिंडण्यापेक्षा ह्या कांबळेच्या पोरांसारख्या पोरांच्या फेस्बुक फीडवर प्रचार केला तर ते नक्कीच पाहतील एरवी घराबाहेरुन भलाथोरला रथ नेला तरी पाहणार नाहीत, एवढं त्याला कळून चुकलं होतं. आताशा वसंतालाही जमू लागलेलं बऱ्यापैकी हे सगळं. कधीकाळपासून केलेली साठवण एकत्र करुन तो ‘इंटरनेट असलेला’ फोन घ्यायलाही गेला होता. पण पेपरांत चिनी लोकांची आगळीक पाहून तापलेल्या त्याच्या मनानं दुकानदारावर भलतीच आगपाखड केली होती. “पाखंडी! अरे स्वत:ला हिंदू म्हणवण्याची हिंमत होते तरी कशी तुझी इतका चिनी माल विकून?” बिचाऱ्या दुकानदारानं शेवटी कार्बनचा एक फोन त्याला दिला. तोही एका महिन्यात बिघडल्यावर, कर्तव्य महत्त्वाचं, अशी स्वत:च्या मनाची समजूत घालून वसंतानं सॅमसंग घेतला होता. त्यावर असलेल्या ‘मेड इन चायना’च्या लेबलवर तो नियमितपणे अबीराचे बोट फिरवी. व्हॉट्सॅपवरचे चिनीमाल रोखण्याचे संदेश वाचून दररोज दुप्पट व्यथित होई.

त्यावर स्वत:चं फेसबुक खातं उघडणं, गावाच्या शाखेचं पेज चालवणं, इन्स्टाग्रामवर कधीकधी स्वयंसेवकांबरोबर कामं करताना सेल्फीज, ध्वजाचे फोटो, एखाददुसरा संस्कृत श्लोक अपलोड करणं वगैरे त्याला जमू लागलं होतं. त्याच माध्यमांवरच्या पोस्ट्स बघून त्याला परत शाखा चालू करायची उर्मी दाटून आली होती. आताशा ह्या माध्यमांवर त्यानं ‘तशा’ पोस्ट्स पाहिल्या होत्या. पहिले पहिले नुसती कोल्हेकुई म्हणून सोडून दिलेल्या ह्या गोष्टी नंतर मात्र भलत्याच वाढत चालल्या. वसंताचं रक्त बाकी उसळायचं. काहीही असलं, आपलं आधी कित्तीही ठरलेलं असलं तरी जननी जन्मभूमिश्च मात्र स्वर्गादपि गरीयसी. हे असलं ऐकून घेण्यापेक्षा मात्र आपलं धर्मसंघटन वाढवावं. आपलाही आवाज वाढवावा. म्हणजे अक्कल येईल एकेकाला. नेहमी शाखेच्या मैदानासमोरून जाताना वसंताला असं अंगात तेज ओसंडत असल्याची जाणीव व्हायची. ते मैदान, आपला धर्म, आपल्याला कसल्या खाईतून बाहेर काढायचाय हे जाणवत असताना त्याला अगदी जाववायचं नाही. दररोज, नित्यनेमानं हिशेबी वसंत त्याला आवरायचा, पण दुसरा वसंत घरी पोहोचल्यावर प्रचंड बंड करायचा.

मग एक दिवस तो उजाडलाच. दिवसभर जवळच्या दुसऱ्या शाळेतली रखवालदाराची नोकरी करून घरी आला. मोबाईल उघडून त्यानं व्हॉट्सॅप पाहिलं. गुल्हाने आणि बऱ्याच समविचारी लोकांनी एक संदेश पाठवला होता.

लोक कसे मूर्खासारखे बरळतात आपल्या पक्षांबद्दल. आपणही सडेतोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे. फक्त हे बोटांची वाफ दवडून नाही! सक्रिय… शाखा परत सुरू झालीच पाहिजे! आमच्या दैवतांची चित्रं रेखाटता, बिंधास्त विडंबनं करता, ‘त्यांच्या’बद्दल जमतं का काही असलं करायला? एकेकाच्या पाठीवर प्रहार केले पाहिजेत धरून म्हणजे सरळ होतील. हे लोक आणि बाकी त्यांना खतपाणी घालणारे- म्हणे अभिव्यक्तिस्वातंत्र्य. ते पेपर वाचायला जातो तिकडचे अण्णा नाही का म्हणायचे- “काय नाय, ह्यांना चांगला बांबू दिला पाहिजे. तिकडे सौदी वगैरेमध्ये चाल्तं काय अस्लं? आं? तिकडे एक ‘नि’ काडा ‘निधर्मी’ मद्ला, तेचायला दगड घालतील टाळक्यात.” बरोबरच आहे त्यांचं. आम्ही ऐकून घेतो, ऐकून घेतो म्हणून आवाज करतात हे. परवाच व्हिडीओ आलेला व्हॉट्सॅपवर, की हे लोक कसले पाखंडी आहेत, त्यांचे आपल्या मातृभूमीबद्दल काय विचार आहेत…

अण्णा सेन्सिबल माणूस. फुकट कायतरी फॉरवर्ड करणार नाही. ह्यां लोकांनाच चांऽगलं…. हे विचार नेहमीच, ह्याच क्रमानं मनात येणं त्याला सवयीचं झालं होतं. खरंतर संघापासून विरक्ती घेतल्याला काहीच दिवस झाले होते, पण फेसबुकवरची लोकांची वक्तव्ये पाहून वसंताची तळपायाची आग अगदी टकलापर्यंत जायची. हे लोक आता आपली सद्दी संपल्यानं उगीच गरळ ओकताहेत हे त्याचं मत झालं होतं. पण दुसरा, हिशोबी वसंता मात्र ह्या वसंताला कायम लगाम घालायच्या प्रयत्नात असायचा. बापूरावांच्या वेळचा अनुभव त्याला होताच. परत कांबळेनंही परिस्थितीचं वर्णन एकदा यथार्थ शब्दांत केलंच होतं. पण नवीन नवीन आपण जे युट्यूबवर पाहतो, ते सगळं काय खोटंय? ‘ते’ लोक सरळ हिंदुस्थानविरोधी घोषणा देतात, स्वत:च्या धर्मासाठी इतकं करतात ते काय उगीच? व्हॉट्सॅपवर तर लोकांनी मोबाईलमधून काढलेलेच व्हिडीओ असतात… ते कसे काय काहीतरी बदलून पाठवलेले असतील? युट्यूबवर एकवेळ हा प्रतिवाद मान्य आहे. ते काही नाही, आपणही आपल्या धर्माची मोट बांधली पाहिजे. गावातल्या युवकांना आपल्या अतिप्राचीन, मूल्याधिष्ठित संस्कृतीची यथार्थ ओळख करून दिली पाहिजे. आणि शाखेहून दुसरं चांगलं माध्यम ह्यात नाही.

वसंताला अजूनही आठवतो तो दिवस.

तो शुभ्र दाढीवाला पहिल्यांदाच दिसलेला. गावाच्या वेशीवरच्या रामाच्या देवळात. सदरा, धोतर, झोळी. दाढी चांगली पोटापर्यंत. वसंत तेव्हा देवळातून निघतच होता. तेव्हा तो त्याला येताना दिसला. त्यांची जेमतेम एक सेकंद नजरानजर झाली. वसंत विसरूनही गेला तो दिवस.
नंतर नंतर वसंता देवळात जेव्हा जायचा तेव्हा त्याला तो नेहमी दिसायचा. काय खायचा, काय प्यायचा माहित नाही. निवांतपणे जपमाळ ओढत बसलेला असायचा. जपही मनातल्या मनात. दररोज पांढरंशुभ्र धोतर आणि पांढराशुभ्र सदरा. वसंताला बरंच वाटलं त्याच्याशी बोलावंसं; पण त्याच्याजवळ गेल्यावर तो अगदीच मुखस्तंभ व्हायचा. देवळाला तसा राजरोस पुजारी वगैरे नसल्यानं देवळाची अगदी वाईट अवस्था होती बाकी. ह्या साधूनं देवळात ठाण मांडलं खरं, पण पहिल्या दिवशी हातात झाडू घेऊन देऊळ लख्ख झाडून काढलं. दुसऱ्या दिवशी रामाची मूर्ती धुवून काढली. सगळं निर्माल्य, देवळाबाजूच्या जागेत खड्डा करून त्यात विसर्जित. त्याच्या डोळ्यांत तेजच इतकं, की कोणीही यायचं नाही विचारायला की बाबा काय करतोएस. वसंताला हे पाहून त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला होता. एक दिवस वसंता बोललाच त्याच्याशी.

साधू काही बोलला नाही. त्यानं वसंताकडे मख्खपणे पाहिलं. त्या नजरेत बेफिकीर, किंवा अलिप्तता अशी नव्हती. किंबहुना सगळंच माहीत असलेल्या माणसाला काहीतरी नवीन असं दाखवावं आणि त्यानं त्या गोष्टीकडे, “ह्यात नवीन काय आहे?” अशा काहीशा नजरेनं पहावं असं काहीसं भासून गेलं. मग तो एकदम म्हणाला –

“ध्यान करतोस ना रोज? इथे, जरा पवित्र ठिकाणी येऊन करत जा! सगळे वसंत पळून जातात की नाही बघ!”

वसंताला धक्काच बसलेला ते ऐकून. ह्याला आपलं नाव कसं माहीत? आपल्या मनानं आपल्या तत्त्वांशी मांडलेला उभा दावाही कसा ह्याला माहीत? खरोखर साक्षात्कारी असावा का हा? वसंतानं त्यादिवशी काढता पाय घेतला खरा तिथून, पण दिवसभर एक तीक्ष्ण आवाज त्याला कशातही लक्ष देऊ देत नव्हता. त्याला प्रचंड उत्सुकता लागलेली होती ह्या साधूबद्दल; आणि त्याला दुसऱ्या दिवशी परत जाऊन त्याला भेटल्याशिवाय बरं वाटणार नव्हतं. मन अस्वस्थ, बेचैन होतं. बंदच झाल्यासारखं वाटत होतं जणू. दुसऱ्या दिवशी वसंता गेलाच परत, देवळात जायच्या बहाण्यानं. साधू होताच तिथे. ध्यान लावून बसलेला. वसंतानं त्याचं ध्यान भंग करायची हिंमत केली नाही.

हळूहळू, कालांतरानं वसंता आणि साधूची मैत्री जमली. साधूनं आपलं नावही सांगितलं नाही, ना आपलं गाव. त्याला ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, दासबोध मुखोद्गत होते. वसंतानंही हे लहानपणी वाचलं असल्यानं त्यांच्या ह्यावर बऱ्याच गप्पा रंगायच्या. दिक्कालांचं भान विसरून. वसंताला, आयुष्याला एक अर्थ मिळाल्यासारखा वाटू लागला होता. त्याची शाखा घेणं, आणि त्या बैठकांनाही जाणं थांबलं नव्हतंच. त्याचे बरेच भंडावणारे, परस्परविरोधी प्रश्न त्याला कायम अस्वस्थ करत असायचे. साधूशी संध्याकाळी गप्पा व्हायच्या. वसंतला एकाएकी निरर्थक, पोकळ होत जाणाऱ्या दिवसात जरा जीव आल्यासारखा वाटायचा. का कोण जाणे, ह्या साधूशी एक अंतस्थ नातं असल्याचा त्याला नेहमी भास व्हायचा. साधूमुळे देवळालाही जरा कळा आली होती. एरवी देऊळ म्हणजे सगळा आनंदच होता.

वसंताला जुन्या, अगदी ३-४ वर्षांपूर्वीच्या काळात जर हा साधू असता तर काय धमाल आली असती, हा विचार करून नेहमी विषण्ण वाटायचं. अण्णा, गुल्हाने, हळदणकर, बायकांचं भजनी मंडळ, इतरही लोक आपले देवळात दुपारी जमायचे. साधूनं झकास प्रवचन, कीर्तन केलं असतं. गाव कसं जिवंत वाटलं असतं एकदम. पण आजकाल सगळे लोक त्या हातातल्या जादूई डबीत डोकं घालून. ती डबीही हरहुन्नरी म्हणा. पटापट, एकामागून एक रतीब सुरूच आहे मनोरंजनाचा. उघड्यावाघड्या भावनांचा. कल्लोळ. आपल्यालाही तो हवासाच वाटतो म्हणा, घरी कितीही उकडत असलं तरी पडल्या पडल्याच, एकेक गमतीशीर विनोद, देशोदेशींचे फोटो, कसले कसले भन्नाट व्हिडिओ पाहण्यात वेळ कसा जायचा कळायचंच नाही. शाखा घेणं, चटचटत्या उन्हात सायकल चालवत कुठेही जायचं जिवावर यायचं. एक मस्त सुस्ती चढते डोळ्यांवर, पर्यायानं मेंदूवरही. आपला धर्म कसा संकटात आहे, आणि सगळेच बिगरहिंदू हिंदूंमध्ये फूट पाडायला कसे टपले आहेत हे ह्यातूनच तर कळायचं.

पण ह्या ‘हिंदूविरोधी’ जमातीत तो बराच वावरून आलाही होता. आधी आधी तर त्याला त्यांचे एकेक विचार ऐकून रोमरोम पेटून उठल्यासारखं व्हायचं. त्याला त्यांची साधारण बैठक आठवायची. सगळ्या बायका एकूणएक मानेपर्यंत कापलेल्या केसांत आणि पुरुष, ते दोरीचा चष्मा, किंवा जुन्या फ्रेमचा चष्मा लावून. सगळ्यांच्या कपड्यांचे रंग उदासीन. खादी खादी आणि फक्त खादी. बरं, राहणी अगदी साधीच म्हणावी तर सगळ्यांकडे गाड्या, दुचाक्या आहेतच. वसंता आणि संघाचे बरेच कार्यकर्ते गेली चाळीस वर्षं त्याच त्या ‘हर्क्युलीस’वरून फिरताहेत. पोरासोरांना उद्योग नाही म्हणून मारुतीची पालखी जरा काढली की काय म्हणे ‘ब्रह्मांडाभोवते वेढे वज्रपुच्छे’ करणाऱ्याला पालखीत बसवताय, दिवाळी आली काय प्रदूषण करताय, होळी आली की काय पाण्याची नासाडी करताय, वटसावित्रीमध्ये काय गुलामगिरी चालवल्ये स्त्रियांची इत्यादी आरडाओरडा करायला सगळ्यात पुढे. वसंताला तेही पटायचं. हिंदूंकडे ‘त्यांच्या’त चालतं तर आमच्यात का नाही? हे सोडून वाद घालायला काहीच मुद्दा नाही हेही त्याला कळून चुकलं होतं. सकाळी सकाळी शाखेत मनातला ‘तो’ वसंत हे विचार घेऊन तयार असायचाच. प्रहार चुकायचे. संचलन विसरायला व्हायचं. सगळं सोडून साधूसारखंच देवळात बसावं असं वसंताला जवळपास दररोज वाटायचं. पण, कधी तरी त्या लोकांची बैठक असली, की जुना, तोच वसंत मनात उभा रहायचा. म्हणायचा, की अरे, तर्क तर्क विज्ञान विज्ञान किती दिवस खेळणार? मनाला जो आधार हवा आहे तो देवाहून चांगला शोधणार आहेस का दुसरा? आहे हिंमत? आणि जर हे मान्य असेल तर मग ही तुझ्या तर्काशी विसंगती नाही काय? दररोज दोन्ही वसंत एकमेकांना ओरबाडायचे. चावे घ्यायचे. रात्री थकून सतरंजीवर आडवं झालं, की मोबाईलमधले सगळे मेसेजेस पाहणं हा वसंताचा छंद होता. दररोज अगदी भावुक, पाषाणालाही पाझर फोडतील असे स्वत:चाच अजेंडा रेटणारे कमीत कमी शेदीडशे मेसेजेस असायचे. ते वाचून दोन्ही वसंतांना शस्त्रंच मिळायची जणू त्या लढाईसाठी. मोबाईल बंद केला तरी ते तुटून पडत असायचे एकमेकांवर. ह्या दोन मनांच्या युद्धात वसंत मात्र पार गलितगात्र व्हायचा. अगदी थकून जाऊन त्याचे डोळे कधी मिटायचे हे त्याला कधीच कळायचं नाही. सकाळी उठून मात्र हे विचार नाहीसे व्हायचे. आजच्या दिवसात काहीतरी नवीन करू, सगळ्यांना धडा शिकवू असे आशादायी विचार त्याच्या मनात गर्दी करत. मनातले ते दोन वसंत मात्र थकलेले असायचे. पण जसा तो आंघोळ करून शाखेवर जायला निघे, तसा जुना वसंत परत उभा राही. सगळ्यांना धडा शिकवू, हिंदू असून हिंदूंवर दुगाण्या कशा झाडतात, एकेकाला अक्कल शिकवू असा तो विचार करे. नवा वसंत लगेच त्यांनी गाय मारली म्हणून… भूमिका घेई.

वसंत बिरेवारचा दुसरा दिवस – १

भाग १

पूर्वप्रकाशित: ऐसीअक्षरे ‘पोस्ट ट्रुथ’विशेष दिवाळी अंक २०१७: ‘साक्षात पश्चात : श्रोडिंजरची मांजर बॉक्सात?’

‘वसंत बिरेवारचा एक दिवस’ ह्या कै. अरुण साधूकृत कथेचा, सध्याच्या काळातला पुढचा भाग. लेखकातर्फे ही अरुण साधूंना आदरांजली.

सायंशाखेत एकाएकी जास्त डोकी दिसायला लागून बरेच दिवस झाले होते. त्या पहिल्या दिवसापासून बिरेवारचं डोकं भणाणायचं कमी झालं होतं. तेवढीच प्रचाराला जरा मदत व्हायची. पोरं ध्वज गुंडाळणं, संख्या-संचलन घेणं वगैरे कामं भराभरा आटपून टाकायची. अलीकडचं नवीन, आणि प्रचाराचं प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सॅप, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वगैरेवर प्रचार करायला म्हणून वसंतानं MS-CIT करून घेतलं होतं. त्यासाठी गावातल्या एकमेव सायबरकॅफे-कम-MS-CIT प्रशीक्षण केंद्रात भर दुपारी रखरखत्या उन्हात सायकल हाणत जाण्याचं कामही त्यानं केलं होतं. त्याचा मालक शिंदे. त्याच्या पोराला बापूसाहेबांनी नोकरी लावून दिली, आणि वसंतभौ बापूसाहेबांचे खास, म्हणून त्याला भरघोस सवलत दिली होती.

बापूसाहेबांच्या आठवणीनं वसंताच्या मनात सूक्ष्मशी कळ उठली. बापूसाहेब गेल्याला साधारण चार वर्षं होत आली असतील. मधुमेह बराच चिघळून अंथरुणाला खिळलेले शेवटच्या दिवसांत. बापूसाहेब आज असते तर बदललेल्या वसंताला पाहून त्यांना नक्की काय वाटलं असतं, ह्याचा विचार करुन स्वत:बद्दल थोडं वाईट वाटण्याचेही दिवस सरले होते. सगळेच दिवस सरले होते. बापूसाहेबांना एकदा बौद्धिकात चक्कर आली, आणि आपण सगळे धावलो. गुल्हाने आणि आपण त्यांना त्या इब्राहिमभाईच्या गाडीतून हॉस्पिटलात नेलेलं. डॉक्टर तसे सज्जन वाटलेले, त्यांनी निदान केलं, इब्राहिमभाईची ओळख निघाल्यावर त्यांनी पैसेही घेतले नाहीत. चांगलीच वाढली होती शुगर बापूरावांची. नंतर त्यांना डायबेटीक फूट का काय तो झाला. पाय अखंड प्लास्टरमध्ये. नंतर काही शाखा म्हणाव्या तशा भरल्या नाहीत. उगीच घरी करमत नाही म्हटल्यावर शाखेत येणारे, बापूरावांनी म्हटल्यासारखे ‘कुंपणावरच बसून राहणारे शिखंडी’च वाढले. आता कुंपणावर बसलेला बलराम, आणि काही असलं तरी लढलेला तो शिखंडी हे वसंताला माहीत होतं. पण बापूरावांच्या धगधगत्या वाणीपुढे ह्या शंका काढणं त्याच्या कुवतीत नव्हतं. नंतर तेही गेले. गुल्हाने, हळदणकर वगैरे एक दोन दिवस आले, पण शाखा शाखा म्हणतात ती काय आधीसारखी झाली नाही. नंतर नंतर तर बरेचदा मैदानात वसंता एकटाच जाऊन बसून रहायचा. इब्राहिमभाईनं त्याला थोडे दिवस दिले पैसे, पण नंतर मात्र अगदीच हातातोंडाशी गाठ येऊ लागली, तेव्हा ४ मैलांवरच्या सरकारी शाळेत बापूरावांच्या ओळखीनेच त्याला पीटी शिक्षकाची नोकरी मिळाली. तिथे दररोज सायकलीवरुन जाणं, तिथेही मुलांबरोबर उड्या मारणं आणि संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात परत येणं ह्यामुळे वसंताला लागायची सपाटून भूक. आजींनी दिलेलं दही-कोशिंबीर-पोळीभाजी असली तर असली, आणि तीही मिळणार घरी गेल्यावर. आताशा वडापाव वगैरेंच्या गाड्या बऱ्याच फोफावल्या होत्या. त्यातही एक आधीचा स्वयंसेवक. वसंताला ओळखून तो त्याला एखादा पाव असाच देई, वडे-भजी तळल्यावर उरणारा चुरा वगैरे असला तर फुकट देई. कधीमधी उधारी चालवून घेई. वसंता मात्र दोन दिवसांच्या वर उधारी ठेवत नसे. पाव खरंतर त्याज्य. पण पोटातल्या आगीपुढे कसलं त्याज्य नि कसला धर्म. त्याला अजूनही आठवतं – एकदा प्रचाराला तो कांबळेच्या घरी गेला होता. त्याचा मुलगा साधारण पाचवीत वगैरे असेल. इंग्लिश शाळेत शिकणारा. बापाचं मराठी आधीच दिव्य, त्यात पोराची शाळा इंग्लिश म्हटल्यावर त्याला काही वसंताशी बोलता येईना. वसंताचं माथं बरंच सणकलं होतं त्या दिवशी. पण कमीअधिक ह्याच प्रकारच्या गोष्टी सगळीकडे पाहून तो व्यथित झाला होता आणि आता तर असा काळ आला होता की…

त्याला अजूनही कांबळेचं वाक्य आठवतंय – “वसंतभौ, संस्क्रिती आन धर्म काय ताटात चाटायला यायची नाय! ह्या सर्व शिकलेल्या अमीर लोकांच्या हॉबी… हितंतितं गांड मरवायला आपल्यासारखेच पोरं लागतात. आता तुमी इतके दिवस पाव खाता. पयल्यांदा आठीवतंय काय, निस्ता वडा खाल्लेलात आनि मग परत आलेला, चार वडे बसवले तुमी तेवा. दुसऱ्या दिवशीपासून इज्जतीत दोन दोन वडापाव खायला लागले की नाय? तसंच आस्तं… सोडा तुमी. मी म्हनतो च्यामारी लात घाला त्या शालेला आनि माज्याबरोबर गाडीवर या. दोन टाईमचा नाश्टा आपन देतो. फक्त पुड्या बांदा, चटणी बांदा एवडाच करा.” वसंताचा स्वाभिमान काय डिवचला गेला होता त्यादिवशी! मी? कट्टर धर्मोपासक, संस्कृतिरक्षक हे म्लेंच्छांचं खाणं वाटायला येऊ? जमणार नाही! कदापि जमणार नाही! वसंत तेथून तडक निघाला होता आणि त्यानं एक महिना एकभुक्त रहायचा निर्णय घेतला होता. त्यातही वडापाव बाद. पाव तर नाहीच. पण साधारण आठवडाभरात त्याचा निर्णय क्षीण झाला. त्याच्या प्रखर विचारी मनानं आणि अत्यंत हिशोबी मनानं एक अघोरी द्वंद्व मांडलं होतं. त्यांच्यातल्या वादविवादांच्या आवर्तात त्याला त्याचं स्वत्व हरवल्याची प्रचंड जाणीव व्हायची. कधीतरी समाधिस्थ शरीर पोटातल्या वणव्यानं प्रचंड बंड करायचं. अशाच एका क्षणी तो आवेगानं उठून दुसऱ्या वडापावच्या गाडीवर गेला होता. नेमका हातात आलेला खमंग, पिवळाधमक वडा खाताना त्याला कांबळे दिसला. वसंतानं आपला चेहरा लपवायचा इतका क्षीण प्रयत्न कधीच केला नसेल. त्यावेळी त्याला एकाएकी प्रखर वस्तुस्थितीची जाणीव झाली. लख्खकन त्याच्या मनात तो विचार, जो इतके दिवस, इतक्या निकरानं दाबायचा त्यानं प्रयत्न केला होता, तो उफाळून आला. त्यानंतर त्यानं शाखेत जाणंच सोडलं. शाखेच्या मैदानाच्या जवळपास जरी गेलं तरी ते भयाण, भेसूर वाटू लागायचं. मोडका ध्वजदंड अजूनच केविलवाणा वाटू लागायचा. सायंशाखेत एकाएकी पोरं दिसू लागली ती ह्या गेल्या दोन तीन वर्षांत. साधारणत: शाखेत येणारा तरुणवर्ग कधीच गायब झाला होता.

सगळा तरुणवर्ग, आणि थोडे प्रौढही दिसायचे ते ‘त्या’ बैठकांना. गावातलं ते एक घर. त्या घराबाहेर इलेक्ट्रिक बेलऐवजी एक घंटा. एक टागोर, आणि एक मदर तेरेसाचा फोटो. मदर तेरेसाचा फोटो पाहून वसंताची तळपायाची आग मस्तकात जायची. त्यानं व्हॉट्सॅप, फेसबुकवर बरंच वाचलं होतं मदर तेरेसाबद्दल. चांगलं तर लहानपणीच वाचून झालं होतं. आता हे ह्या वयात वाचायला मिळालं. त्या घरात महिन्यातून एक-दोनदा काय इतकं घडतं की ही शहरी फुलस्लीवचे टीशर्ट आणि तट्ट टाईट जीन्स घालणारी पोरं इथे जावीत? फक्त तेव्हढीच असती तर उत्सुकता वाटायची गरज नव्हती म्हणा, पण जोशीसर, त्यांचे मित्र वगैरे गावातले ‘बुद्धिवादी’ही तिथे जमायचे. दिवसभर आपले काड्यावाले चष्मे सांभाळत, गाड्यांमधून फिरायचे. साड्या आणि ते सदरे मात्र खादी. काहीही करायला गेलं की ह्यांचा विरोध आहेच. तरीही, आधी शाखा घ्यायचो आणि मध्यंतरी इतके दिवस नाही घेतली म्हटल्यावर. आपणही शोधत होतोच जरा अर्थ. गेलो. तर, त्या जोशी ‘सरां’नी एकदा खास येऊन बोलवलं बैठकींना. म्हणे, धर्माचा खरा अर्थ तुला तिथे कळेल. आमच्याबद्दल जे तुझं मत आहे ते बदलायची आशा आहे. वसंताला तसंही घरी करमत नव्हतंच तेव्हा. तो गेला एका त्यांच्या एका चर्चेला. तिथे एक अजून ‘सर’ आलेले होते. विशी ते साठीपर्यंतची माणसं. सगळे आपले सर. बायका मॅडम. त्यांच्या खादीच्या झब्ब्यांत आणि पायजम्यांमध्ये वसंताला स्वत:च्या शर्ट आणि लेंग्याची फारच लाज वाटत होती. ह्यांचा धर्म दिसण्यासारखं ह्यांनी काहीही घातलं नव्हतं. पहिल्यांदा हे जोशी सर उठले – “आज आपल्यात एक खास माणूस आलेला आहे. आपण त्याचं स्वागत वगैरे फॉर्मल शब्द वापरणार नाही मी, अभिनंदन करू या – की आपल्या विचारसरणीशी बंड पुकारण्याची हिंमत त्यानं केलेली आहे म्हणून.” वसंताला आपण काहीतरी घोर महापाप करतो आहे असं वाटत होतं. पण सगळ्यांनीच एकदम हसून त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा त्याचीही भीड जरा चेपली. कसंनुसं हसून त्यानं त्या अभिनंदनाचा स्वीकार केला. पण त्याला जास्त फुटेज न देता एकदम जोशीसरांनी – “आता आपले प्रमुख पाहुणे-” म्हणून अजून एका नवीन सरांची ओळख करून दिली. लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. वसंताला वाटलं, हे ह्यांचं बौद्धिक. चला, ह्यात वेळ बरा जाईल. शिवाय, हे जरा अनौपचारिक असल्यामुळे आपल्याला परत प्रश्न वगैरे विचारता येतील. ते सर बोलायला उठले. खरं तर विषय होता ‘संविधानाचं श्रेष्ठत्व’ का काही तरी. पण साधारण पाच मिनिटं संविधान कोणी लिहिलं, कसं लिहिलं इत्यादी सामान्य ज्ञान झाल्यावर, त्यांनी नेहमीची पट्टी घोकायला घेतली. “आजकाल खूप कोलाहल माजला आहे, मनं बधीर झाली आहेत, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे…” वसंताला ते मनोमन पटलेलं असलं तरी त्याला त्यामागचं मर्म लक्षात आलं. नंतर आजूबाजूला कुजबूज सुरू झाली. कोणाचंही लक्ष त्या भाषणात नव्हतं. वसंत मात्र अगदी मनापासून ऐकत होता. ह्यानंतर एक इवलीशी मुलगी उभी राहिली. तिनं एक कविता वाचायला आणली होती.

“आई, का गं लोक इतके चिडतात?
सगळ्यांमध्ये ब्लड सेमच
पण धर्मावरून वाद घालतात?”
हे ऐकल्यानंतर वसंताला काय चाललंय ह्याची जाणीव झाली. ह्या कवितेचा संविधानाशी काय संबंध बुवा, हा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. मग त्याला कळलं की ती मुख्य पाहुण्यांची मुलगी आहे. अर्थात, ते शब्द त्या मुलीचे नाहीत हे त्याला कळून चुकलं होतं. तरुणवर्ग आपल्याच गोटात काहीतरी कुजबुजण्यात मग्न होता. प्रौढ काहीतरी गप्पा मारत होते. बायका मात्र ते ऐकून आनंदानं माना वगैरे डोलावत होत्या. गर्दी गोळा करण्यासाठी इतकं तर करावंच लागतं हे त्याला ठाऊक होतं. पण बाकी ह्यांचे विचार त्याला फार आवडले. तो नियमित त्यांच्या बैठका, परिसंवाद, व्याख्यानं इत्यादींना जाऊ लागला.

कालांतरानं त्याला त्याचाही कंटाळा येऊ लागला. संघाच्या विचारसरणीत आणि प्रात्यक्षिकांत जे कालानुरूप बदल झाले, त्यातून त्याला त्यामागचं मर्म उलगलं होतं. पण ह्या लोकांचंही काही वेगळं नव्हतं.

तारुण्यरुदन

(लोकसत्ता-लोकरंग १०/१२/२०१७ मुखपृष्ठ ‘आपण संवेदनाहीन झालोय…?’ लेखाबाबत प्रतिक्रियात्मक लेख)

गेल्या दशकात समाजधारणा, समजुती, दृष्टीकोन ह्यांनी बरीच मोठी झेप घेतलेली आहे. अर्थात त्याचे बरेच परिणाम कलाक्षेत्रावर झाले. पटकन मिळणारी जागतिक स्तरावरची प्रसिद्धी ह्यामुळे स्पर्धा, सादरीकरणाच्या पद्धती ह्यांच्यात भलताच फरक जाणवला. उदाहरणार्थ, मला आठवतंय, साधारण ७-८ वर्षांपूर्वी तिकीट खिडकीवर इमानेइतबारे रांग लावावी लागायची. दर आठवड्याला सिनेमा पाहणं हा बऱ्यापैकी ‘रईसी छंद’ होता. त्रिमीतीय चित्रपट म्हणजे पर्वणी, काहीतरी हाय फाय अशी धारणा होती. नाटकांचं काही फार वेगळं नाही. नाटकातील कलाकारांभोवती चित्रपट कलाकारांइतकंच वलय होतं.
ह्या सगळ्या गोष्टी जुन्या म्हणून कुरवाळत बसाव्या, की अडचणी म्हणून त्यांच्यावर मात करून , अधिक गतिमान, अधिक सोईची व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावा हे ज्याचं त्यानं ठरवावं. अधिक सोय, अधिक गती हीच काळाची दिशा आहे. तिच्याविरुद्ध जाऊन उगीच जुन्याच गोष्टी कशा चांगल्या, सकस आणि नवीन सगळंच कसं पानी कम हे नवीन काळातलं ‘तारुण्यरुदन’ म्हणावं लागेल. सध्याचं तारुण्य हे ‘आपलं’ राहिलं नाही ह्याबाबतचा व्यर्थ आक्रोश.

लेखात बऱ्याच ठिकाणी सरधोपट विधानं आहेत. एक उदाहरण घ्यायचं; तर मुंबई. हे शहर नाही. मुंबई ही एक जीवनशैली आहे. हे शहर तुमच्या रक्तात उतरल्याशिवाय राहत नाही. मुंबईतली जीवनशैलीही अर्थातच ह्याला साजेशी आहे. आपल्याला रिझवणाऱ्या, सुखावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत जायचं म्हणजे लोकलचं कोष्टक किंवा ट्रॅफिकचं गणित तोंडपाठ असावं लागतं. त्यामुळे आठवडाभर हे करणाऱ्या लोकांना परत आराम, रिझवणारी गोष्ट म्हणजे उशिरापर्यंत झोपणं, चविष्ट काहीतरी खाणं आणि एखादा चित्रपट/नाटक/प्रहसन/संगीत कार्यक्रम पाहणं इतकंच उरलेलं आहे. त्यासाठी दूरचित्रवाणीही हळूहळू कालबाह्य होऊन ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, व्हूट, हॉटस्टार आदी गोष्टींनी हवं तेव्हा, हवं तितकं आणि दर्जेदार मनोरंजन उपलब्ध करून दिलेलं आहे. यूट्यूबवरही बरंच काही उपलब्ध आहे. गेल्या पन्नास वर्षांतले बरेच चित्रपट, काही नाटकंही. त्यामुळे, अगदी आवर्जून घराबाहेर पडण्यासाठी तितकंच साजेसं काही असेल तर त्यासाठी युवावर्ग बाहेर पडेलही, पण तसं आज उपलब्ध आहे तरी काय?

मराठी चित्रपट पाहिले, तर तेच ते, तेच ते विषय, तेच ते कलाकार घेऊन नवीन फोडणी दिलेल्या गोष्टी पहायला मिळतात. ‘तरूणांसाठी’ म्हणून केलेल्या चित्रपटांमध्येही काही नाविन्य क्वचितच पहायला मिळतं. नाटकं असतात खरी दर्जेदार, पण निर्भेळ आनंदासहीत जरा जगण्याबाबतचं चिंतन वगैरे असलेलं ‘गोष्ट तशी गमतीची’ वगैरे फारच विरळा. अत्रे, डांगे, वाजपेयी, पु.लं. सारखे वक्ते तरी राहिलेयत कुठे? सध्याच्या वक्तृत्वात मतं खोडून काढण्याचा आवेश दिसत नाही. तो कोणी दाखवलाच तर त्याला बरेचदा असंवेदनशील म्हणून हिणवलं जातं. समाजमाध्यमांमुळे हे करून दाखवणाऱ्यावर कोणीही, कशीही अश्लाघ्य टीका करू शकतो. ह्यामुळे खरोखरीचे प्रगल्भ लोक तोंडावर बोट ठेवून असतात. सगळ्यांनाच मान्य, सगळ्यांसाठीच गोग्गोड अशीच मतं सगळीकडे मांडली जात राहतात. टीका हीही अशांवर केली जाते जे समाजाकडून तसेही निरपेक्षरीत्या वाईट ठरवले गेलेले असतात.

ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून एक ‘सामाजिक सत्य’ निर्माण होत जातं. ह्या सत्याच्या विरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दडपला जातो, टिंगलटवाळी करून/अश्लाघ्य/अपरिपक्व टीका करून त्यांचं म्हणणं न खोडता आवाज दाबला जातो. हे लोक गप्पच बसतात किंवा मग अगदीच दुसरं टोक गाठतात. मधल्यामध्ये रसिक, मध्यमवर्ग इ. कंटाळलेले असतात. त्यांना ह्याच सर्वसंमत गोष्टी पहायचा कंटाळा येणं, किंवा त्यासाठी पैसे/वेळ न मोजावेसे वाटणं स्वाभाविक आहे. आधीची पिढी, जिने खरंतर इतकीऽ मोऽठ्ठी साहित्य/कलांची पायाभरणी म्हणे केलेली आहे ती तरी काय करतेय मग?

इथे आपण मूळ मुद्द्यापाशी येतो. आधीच्या पिढीनेच, कमअस्सल सगळ्याच मध्यमवर्गात तरी; चंगळवाद इत्यादी गोष्टी कळत-नकळतपणे रुजवल्या. ह्या संदर्भातली समांतर चर्चा <a href=”http://aisiakshare.com/node/6245″>ह्या धाग्यावर</a> पाहता येईल, <a href=”http://aisiakshare.com/comment/161285#comment-161285″>पुंबांची दिलखेचक टिप्पणी</a>ही अवश्य वाचावी. अशा वेळी, नकळतपणे मागच्याच पिढीने सध्याच्या युवावर्गाला ह्या मार्गावर येणं भाग पाडलेलं नाही काय? ती पिढी सध्या काय करतेय म्हणे? ती तिच्या तरुणपणच्या स्टीमपंक मुंबईत अजून हरवलेली आहे. नौशाद की यादें आणि एव्हरग्रीन शंकर जयकिशन, गेला बाजार खळे, वाडकर-मंगेशकर ह्यांच्यातून ती बरीचशी बाहेर आलीच नाहीए अजून.

अहो, हे ऐकलंय आम्ही. कॅथोड रे टीव्ही पासून ते स्पॉटीफाय पर्यंत अभिजात अभिजात म्हणून तुम्हीच कोंबत आला आहात आमच्या ज्ञानेंद्रियांत हे.

जमाना विद्या व्हॉक्स, न्यूक्लेया, सनबर्न फेस्टीव्हल, टीव्हीएफ-एआयबीचा आहे. त्यांचं कितपत चांगलंय, कितपत अभिजात वगैरे आहे इत्यादी अलाहिदा. ह्यांचं गाजतंय, तरूणवर्ग ह्यांची तिकीटं प्री-बुक करतोय, प्लॅनवर प्लॅन खपवतोय तर ह्यांचे गळे घोटायला तर तुम्ही सज्जच आहात. त्यांचं काही चुकतं आहे का? चुकत असेल तर ते दुरुस्त करायला तुमचा पुढाकार आहे का? टीव्हीएफ ट्रिपलिंग पाहिलीत का? पहाच. <a href=”https://www.youtube.com/watch?v=JwaniAD6D-I”>त्यातल्या एका एपिसोड</a>मध्ये खालील संवाद आहे:

<em>चितवन: मी डीजे आहे. संगीतकार वगैरे.
वयस्क माणूस: अच्छा अच्छा. कुठलं वाद्य वाजवता?
चितवन: नाही हो… मी संगीत फक्त एकत्र करतो. संगणकावर त्यातून स्वत:चं संगीत बनवतो.
व.मा.: संगणकावर?
चितवन: हो.
व.मा.: मग त्यात तुमची काय प्रतिभा?
चितवन: (चेहऱ्यावर त्रासिक भाव.) बरंच क्लिष्ट काम आहे हो, संगीताची जाण असणं फार गरजेचं आहे.
व.मा.(उपहासात्मक): तुम्हाला आहे का? नाही म्हणजे, वाद्यं वगैरे वाजवता तर येत नाहीत ना तुम्हाला? तबला, सारंगी, तानपुरा वगैरे… तुम्ही तर रिमिक्सवाले…</em>

ह्यानंतर मागच्या पिढीला संगीतातून काय हवं होतं नी ह्या पिढीला काय हवंय, इतक्या प्रश्नाबद्दल जरा विचार केला तरी माझा मुद्दा स्पष्ट होईल.
असो.

नंतर एकाएकी लेख जो तत्त्वचिंतनात्मक होतो त्यामुळे उगीच तो अभिनिवेशपूर्ण वाटतो. कलांच्या आवडीनिवडीवरून लेख एकाएकी जीवनशैलीवर घसरतो. शुद्धलेखन, शुद्ध व्याकरण ह्याचे संस्कार खरंतर कोणी केले पाहिजेत? ते करण्यात ते आणि त्यांनीच आखलेल्या चौकटी यशस्वी झाल्या आहेत का? उत्तर तर नाहीच दिसतंय. लोकसंख्येचाच स्फोट इतका झालाय की दररोज वेगवेगळे प्राणी प्रवचन झोडायला तयार असतातच. कायम स्वत: साठी काही नाही केलं, कसं दुसऱ्यांसाठी जगलो आणि कशी चूक केली वगैरे रडगाणी गाणाऱ्या आधीच्या पिढीने शब्दांवाचून, शब्दांच्या पलिकडलं बरंच ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे ह्या पिढीवर केल्या गेलेल्या संस्कारांतला फोलपणाच जागोजागी दिसणाऱ्या नव्या पिढीने ही तत्त्वं झुगारून देणं शहाणपणाचंच ठरतं.

त्यामुळे शेवटच्या परिच्छेदात जो काही शंभर ओळींचा निबंध पूर्ण करण्याचा अट्टहास जाणवतो तो वगळता मूलगामी प्रश्न जो विचारला गेलेला आहे, त्यावर, आधीच्याच पिढीने विचार करणं जास्त सयुक्तिक आहे. आणि तितका जर करायची इच्छा असेल, तर मग परिच्छेदाच्या आधीच्या भागास तसा काहीच अर्थ उरत नाही.

(माझा लेखकांबद्दल काही आकस नाही. त्यांची एक सदाबहार मालिका, बरेच चित्रपट पाहतच मी लहानाचा मोठा झालो. त्या लेखाद्वारे त्यांनी, आणि ह्या लेखाद्वारे मी एक काळाची गरज असलेल्या संवादाला सुरूवात करून द्यावी इतकीच सदिच्छा.)

शौचालय – एक भीषण कथा!

5ccb7e0d5979882e5f16c75c5c4208cb--funny-toilet-signs-toilet-humor

शीर्षकावरून स्पष्ट झालेलं नसेल, तर आधीच नमूद करू इच्छितो की हा महाराष्ट्रातील (कारण आपली पोहोच तिथपर्यंतच) शौचालयांचा एक दर्जावार चिकीत्सा करणारा लेख आहे. वित्त-ज्ञान अर्जन किंवा मनोरंजनानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी फेरफटका झाल्यामुळे शौचालये ह्या विषयावर भन्नाट माहिती उपलब्ध आहे. तीच जरा मजेशीर आणि जमलंच तर जरा विचारप्रवर्तक वगैरे पद्धतीत सादर करण्याचा प्रयत्न.

शौचालये सार्वजनिक असतात, एखाद्या घरातील असतात. मुंबई ही वेगवेगळ्या आर्थिक स्तरांच्या दृष्टीने एक भन्नाट भेळ आहे. लोकांची, त्यांच्या राहणीमानाची आणि अर्थातच मग त्यांच्या स्वच्छतांच्या सवयींची. एखाद्या व्यक्ती/कुटुंब/व्यवसायाचा आर्थिक स्तर खरोखर जोखायचा असल्यास त्यांच्या गाड्या, त्यांचं मुंबईतलं स्थळ आदी गोष्टी न पाहता शौचालयास भेट द्यावी.
एक म्हणजे, शौचालय आणि स्नानगृह वेगळं असेल तर नक्कीच डोक्यानं काम चालवणाऱ्या व्यक्तींशी गाठ पडली आहे असं समजायला हरकत नाही. शौचालय स्नानगृहात असण्यापेक्षा मोठी दुसरी गैरसोय नाही. शौचालयात देशी आणि विदेशी हे दोन प्रकार. देशी सगळ्यात भारी. एकदा गेलं की काम फत्ते. ह्यात फारसे प्रकार नाहीत. फ्लश भन्नाट होतो. ‘बाकी’ कधीच राहत नाही.
विदेशी बाकी आरामाचा मामला. पेपर, पुस्तके, मोबाईल इ. चीजा घेऊन आरामात जाण्यासारखे. लोक चांगले अर्धा अर्धा तास विदेशी शौचालयांत बसून राहतात. काही लोक म्हणे शौचालयात पुस्तककपाट, संगीतव्यवस्था इत्यादी ठेवतात. काही लोक विदेशी शौचालयांवर देशी बैठक मारतात. असते आवड एकेकाची.
विदेशी शौचालयांमध्ये गड फत्ते झाला तरी त्याचं ‘समाधान’ क्वचितच मिळतं. महारथी विनोदवीर श्री. रसेल पीटर्स ह्यांच्या शब्दांत- “तुम्ही आयुष्यात फार फार तर पाचवेळा एकदम ‘भारीतलं’ हगता. तुम्हाला कधीकधी एकदम भारी हगण्याचं समाधान मिळतंही, पण ‘एकदम लक्षात राहील असं’ फक्त पाचवेळाच होतं. ह्या ‘अशा’ वेळी तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर तोही तुम्ही हगून टाकला काय, असंही वाटून जाऊ शकतं, इतकं समाधान मिळतं.”
फ्लश केल्यावर बरेचदा बाकी उरते. मग आपल्या कलाकृतीसमोर ३-४दा फ्लश करा, टमरेलातलं पाणी धाऽस्सकन् ओता इत्यादी चाळे करत उभं रहावं लागतं. बरेचदा नंतर हस्तप्रक्षालनादि विधी उरकल्यावरही थोडी बाकी परत आलेली दिसते. मग परत हे चाळे. अनुभवी मंडळी हे करत नाहीत. बाकी परत आलेली दिसल्यासही ते सगळे इतर विधी उरकतात. तोपर्यंत फ्लशची टाकी भरलेली असते. मग परत जोरदार फ्लश. ह्यावेळी बाकी उरत नाही.
फ्लश मध्येही प्रकार आहेत. शहरांमध्ये ऑटो फ्लश असतात. म्हणजे एकदा दाबून मोकळं व्हा. (श्लेष जाणीवपूर्वक.) काही ठिकाणी मी नळांसारखे फ्लश पाहिलेले आहेत. धो धो पाणी वाहत राहते. बाकी वगैरेंचा प्रश्न नाही. फॅन्सी फ्लश असतात. यिन-यँगच्या स्वरुपात बटणे असलेले. मोठं बटण, मोठा झोत, लहान बटण, लहान झोत. ह्यावरूनही आर्थिक स्तर वगैरे जोखता येतो. कमोडही भिंतीत बसवलेला असेल तर नवश्रीमंत आणि जमिनीतला असेल तर अनुमान नाही, अशी निरीक्षणे आहेत. कमोड बाकी जितका छोटा तितका आर्थिक स्तर उच्चीचा हे अनुमान मी काढलेलं आहे.
ह्याशिवाय स्प्रे आणि जेट हे जरासे नवीन प्रकार आहेत. हात धुण्याचा कंटाळा करणाऱ्या पब्लिकच्या ह्या उचापती आहेत. खरोखर स्वच्छतेची आस असल्यास लोक टमरेलच वापरतात. रेल्वेगाड्यांत ह्या टमरेलांना साखळ्या असतात. रेल्वेगाड्यांचे रूळ हेच बऱ्याच लोकांचे शौचालय असते. काही रुळ फक्त ह्याच कामासाठी बांधलेले असावेत असंही कधीकधी वाटून जातं. बाकी आर्थिक स्तर कसाही असला तरी लोकांना टमरेलसम- कापलेला कॅन, बाटली, रंगांचा डबा इ. परवडतं हेही नोंदवतो. म्हणून त्या साखळीमागचं प्रयोजन लक्षात येत नाही. पण ‘तेजस’ मधला प्रकार वाचल्यानंतर मात्र आपली लायकी हीच हे खेदाने नमूद करावेसे वाटते. बाकी आजकाल रेल्वेगाड्यांतही हे जेट आलेले आहेत. आतल्या बेसिनवरच्या साबणभांड्यात छान मुलायम गुलाबी शॅम्पूसम साबण असतो. त्याला चक्क सुवासही असतो आणि फेसही येतो. अच्छे दिन आहेत कुठे, आहेत कुठे म्हणणाऱ्यांनी ह्याची नोंद घ्यावी.
ह्यावरून आठवलं, रेल्वे/एसटी स्थानकांवरची शौचालये कटाक्षाने टाळावीत. एकतर ती फक्त देशी असतात. विदेशीच्च पाहिजे असणाऱ्या लोकांचे प्रश्न इथे संपत नाहीत. ह्यांच्या दाराची कडी जनतेच्या अच्छे दिनांवरच्या विश्वासाइतकीच मजबूत असते. म्हणून शुद्ध थरार इथे अनुभवता येतो. म्हणूनच गड सहज फत्ते होतो. टमरेलात पाणी सोडणारा तो ‘दुष्काळी फोटो फेम लाल नळ’ असतो, ज्याची एखादी चुकार धार कुठे उडेल सांगता येत नाही. शिवाय ‘मूत्रालया’च्या बाजूलाच असल्याने नाकातले केस पेटत असल्याची भावना होत असते. ह्या सगळ्या दिव्यांतून बाहेर पडल्यावर हात धुवायला साबण नसतो. असलाच तर साधारण सातशे व्यक्तींनी स्नानादी कार्यांमध्ये वापरून ठेवलेला केविलवाणा तुकडा असतो. त्याचा फेस येत नाही. ह्यामध्ये साधारण मागील सात पिढ्यांची जनुके मिळण्याचा संभव असतो. शिवाय विदेशी शौचालये असल्यास त्यात आधी गेलेल्या इसमाची ‘बाकी’ दिसण्याची संभाव्यता ९९ टक्के असते. देशी मध्ये हे दिसत नाही. अभ्यासूंनी कृपया कारण सांगावे.
कमअस्सल हीच कहाणी सार्वजनिक शौचालयांची असते. एकतर तिथे पाणी नसेल, पण बाजूला झोपडपट्टी नक्कीच असेल ह्याची खात्री बाळगावी. एक ‘जनतेचे कलादालन’ म्हणून सार्वजनिक मुताऱ्यांचा निर्देश व्हायला हवा. एकतर नाकातले केस पेटवून मिळतील असा गंध असतो. एक भिंत अध्याहृत द्रव्याने, आणि समोरची भिंत तंबाखूने रंगलेली असते. शिवाय प्रबोधक जाहिराती, भ्रमणध्वनी क्रमांक, उद्बोधक चित्रे, वचने, काव्ये ह्यांनी भिंतीवरची उरलेली जागा सजलेली असते. जसे सादरीकरणापूर्वी एक नमस्कार ठोकणारे कलाकार असतात तसे थुंकणारे कलाकारही इथे येतात. हे थुंकण्यामागचं रहस्य शेवटी इथे उलगडलं. चित्रपटगृहातल्या मुताऱ्या बाकी भलत्याच मोकळ्याढाकळ्या असतात. दोन लगतच्या व्यक्तींमध्ये भिंत नसते. शिवाय खाली बघून हसणाऱ्या ललनांची छायाचित्रेही वर असतात. ह्या सगळ्या परिस्थितीवर व्यथित होऊन ह्या इसमांचे थुंकणे साहजिक असावे. च्युईंगगम ह्या पदार्थामुळे बरेचदा ह्या मुताऱ्या तुंबतात. तुमच्या अगतिकता आणि अनुभवावर तुमची अब्रू अवलंबून असते. अनुभवी व्यक्ती हेही दिव्य यशस्वीरीत्या पार पाडतात. ह्या व्यक्तींच्या परिसरात स्वच्छ, बिना दुर्गंधीचं, झोपडपट्टीविरहीत सार्वजनिक शौचालय शोधून पहा. सापडण्याचा संभव आहे.

मराठी मालिकांची लेखनकृती

पूर्वतयारी:
१. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला ‘युगप्रवर्तक’ पर्यंत नेऊन पोहोचवतील.
२. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर. त्यातही आजकाल ‘युवा’ ह्या भंपक वर्गाची निर्मिती जी झाली आहे ती ह्यात येत नाही. त्या वर्गाला अनुसरून एक भारदस्त आडनाव घ्यावं.

साहित्य:
एक भारदस्त आडनाव. एक घर. घर हे लक्ष्य रसिकवर्गावर अवलंबून आहे. मोठ्ठा वाडा, मोठ्ठं बैठं घर आणि डायरेक्ट बीडीडी छाप चाळ. हे अनुक्रमे नॉमुंपु, मुंपु, मुंममव ह्यांसाठी. एक अति अति अति आज्ञाधारक हिरोईण निवडावी. हिरोईण कशीही चालेल. सावळी असेल तर कथा अजून फुलवायची संधी मिळते. हिरो मात्र गोराच्च बघून घ्यावा. हिरोही बऱ्यापैकी आज्ञाधारक असावा.
एक ऑप्टिमस प्राईम आजी/आजोबा. हे न्यायदेवतेसाठी. हे गोग्गोडच असले पाहिजेत. त्यांची मुले, म्हणजे डार्थ व्हेडर सासूबाई. सहाय्यक कलाकार म्हणजे हिरोईणीचे आईवडील, सासूबाईंची इतर मुले, शेजारी इत्यादी. एकदम बालकलाकार चवीपुरते. संध्याकाळच्या अर्ध्यातासाचा टाईमस्लॉट. एक मराठी वाहिनी. एक टायटल ट्रॅक, जे सगळ्या रसांत वाजवता यावं. (रौद्र/भीषण ते करूण/शृंगार पर्यंत.)

कृती:
कधीही हीरोईणीपासूनच सुरुवात करावी. तिला आणि हीरोला पुराणातील कॉम्प्लिमेंटरी, मॉडर्न टच असलेली नावं द्यावीत. त्यांची पार्श्वभूमी २-३ एपिसोडांत आटपावी. त्यांना पद्धतशीरपणे भेटवावं. पहिल्यांदा त्यांच्यात प्रेमबीम वगैरे होऊ देऊ नये. त्यांच्या भेटीगाठी होऊ देत रहाव्यात. मध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणी, सहकारी इत्यादींकडून सारखं प्रेम प्रेमचा जप करवून घ्यावा. फायनली हिरोलाच पहिली स्टेप घ्यायला लावावं आणि हिरोईणीने ३ एपिसोड आढेवेढे घेऊन होकार द्यावा. इथे तुमच्या वाचनातील वाक्ये टाकायचा बर्राच स्कोप आहे.
लग्नाला उगीच विरोध दाखवावा. इथे व्हिलन/व्हिलनीण छान प्रस्थापित करता येते. ती सासू, नणंद, हिरोची मैत्रीण अशी. पुरूष जनरली नसावेत व्हिलन. ह्या सर्वांमुळे लग्न अगदी होतच नाही अशी खात्री करवून देऊन मग एकाएकी हिरोहिरवीणीचं पुनर्मीलन दाखवावं. पटकन लग्न ठरवून मोकळं व्हावं.
घर कसंही असलं तरी लग्न फुल्लॉन करावं. ह्या महाएपिसोडची जाहिरात कर-कर-करावी. लग्नात सगळं विधीवत आणि सगळ्यांच्या अंगावर भारी कपडे-दागिने असावेत. मुलीने सासरी जायच्या एका एपिसोडात वडिलांनी भाव खाऊन घ्यावा.
मुलगी सासरी गेली की खरंतर काम संपलं. आता इथे तुमची सर्जनशीलता१० दाखवावी. हिरोइण ज्यू असल्यागत छळ कर-कर-करावा. ह्या ह्या घराण्यात११ हे चालवून घेतलं जाणार नाही/आजपर्यंत झालं नाही/खपवून घेतलं जाणार नाही हे संवाद दर एपिसोडला ३-४ टाकावेत. हिरोईण ‘टायटॅनिकफोड आइसबर्ग ची मानवी आवृत्ती’ दाखवावी. हिरोचं तोंड बंद करण्यात यावं किंवा हिरोईणीच्या विरुद्धच वापरलं जावं.
हे चांगलं अडीच तीन वर्षं करत रहावं.
नवीन१२ लेखक/लेखिका आले की गाशा गुंडाळता घ्यावा. सगळ्या व्हिलनगणाचा नायनाट एकेका एपिसोडात आटपावा. इथे हिरोला हाताशी धरुन त्याचाही उदोउदो करावा. नातेवाईक व्हिलन्सचं मतपरिवर्तन करावं. हिरोईणच कश्शी बाई आदर्श आदर्श स्त्री ह्याचा पोवाडा गावा. सगळं कुटुंब एकत्र यावं. मालिका संपली. तुमचा ड्राफ्ट नवीन लेखकांच्या हवाली ‘रेफरन्ससाठी’ करावा.१३

मॅरीनेशन:
सग्गळे सग्गळे सण निगुतीने दाखवावेत. त्यात उगीच नवेपणाची फोडणी देणं१४ आवश्यक. हिरो हिरॉइणीची प्रेमकथा मात्र ह्या सगळ्यांवर मात करून चालू ठेवावी. मध्ये मध्ये चवीपुरतं हिरोईणीचं दुर्गारुप दाखवावं, एखाद्या सरकारी उद्यानात रोम्यांटिक गाणं टाकावं. बाकी हिरोईणीला मेंदू नाहीच अशी प्रेक्षकांची खात्री झाली पाहिजे.
भाषा अगदी ट्रेडमार्क दाखवावी पात्रनिवडीनुसार. लहेजा सोडून कोणी बोल्लाच तर त्याची जीभ छाटली जाईल अशी सूचना लिहून ठेवावी.
तमाशे१५ करता आले पाहिजेत. ह्यात तुमची सर्जनशिलता दिसते.
हिरो-हिरोईणीला आजकालचे कपडे दाखवू नयेत. आजकालचे छंदही दाखवू नयेत. ह्या दोन्ही गोष्टींवरून तमाशा करावा. एकत्र सिनेमा/जेवायला जाण्यावरून झकास एक एपिसोड तमाशा करावा.
हिरो आणि त्याचं मातृप्रेम जबरी दाखवावं. हिरोईणीच्या माहेरी जाण्यावरून तमाशा करावा. काही सुचलं नाही की उगीच काहीतरी परंपरा भंग करवून घेऊन तमाशा करावा. छोटे व्हिलन आणून, त्यांना गुंडाळत रहावं. मधोमध हिरोईणीचा अजूनच छळ करावा.
नाती नाती नाती, माणसं माणसं माणसं चा गजर करत रहावा. अगदी हार्डकोअर ममव मूल्ये प्रेक्षकांवर ठोकत रहावीत.

स्पष्टीकरणे:
१: मराठी मध्यम वर्गीय. काही हुच्चभ्रू लोकांचा नॉनहुच्चभ्रू लोकांना डिवचण्याचा ‘कीवर्ड’. तिसरी जमात अस्तित्वात नसते.
२. फेसबुकावरचे फ्रँड्झ. हे तुमच्या दैनिक जिलब्यांना लग्गेच सुंदर, अप्रतिम, फुले, छान, अप्रतिम, फुले, सुंदर, फुले, आणखी फुले अशा कमेंट्स देत राहतात. त्यांना गोंजारत राहणं महत्त्वाचं. म्हणजे कल्ट प्रस्थापित होतो.
३. हे अनुक्रमे नॉन गावठी आणि गावठी असं वाचावं.
४. भारदस्त म्हणजे पाच अक्षरी. सरनाईक, सरपोतदार, जहागिरदार इत्यादी. २ मधील नॉन गावठी वर्ग असेल तर सुप्रसिद्ध आडनावेही खपून जातात. परब, गोखले, नाईक इत्यादी.
५. हिरोईण हे हिरोचं स्त्रिलिंगी रुप आहे. तिला मोजके पाच एपिसोड सोडून भाव द्यायचा नस्तो. तिचा भाव आणि तिचे भाव हिरोवर अवलंबून असल्याने तिचं नावही हिरोईण.
६. जनरली बुद्धी नाठी झालेले खवचटोत्तम आजीआजोबा नापास.
७. हे उपप्रकार हाताशी असू द्यावेत. हवे तसे उलटसुलट वापरता येतात.
८. माधव-माधवी, मिलींद-रुक्मिणी वगैरे जुनाट नाहीत. छोटीशी. यू गेट द पॉईंट.
९. पहा ५.
१०. नसते शब्दार्थ घेऊ नयेत. इथे तुमच्या सिरीअलची अद्वितीयता दिसते म्हणून तो शब्द.
११. इथे तुमच्या आडनाव निवडीतली ताकद दिसून येते. ‘सान्यांच्या घराण्यात’ला ‘सरपोतदारांच्या घराण्यात’ इतका जोम नाही येत.
१२. हा विनोद आहे. आतापर्यंत कळला पाहिजे.
१३. कळला का १२ मधला इनोद मंडळी?
१४. इको फ्रेंडली गणपती, फटाक्यांशिवायची दिवाळी, पाण्याशिवाय होळी, सुताशिवाय वटपूजा इत्यादी.
१५. म्हणजे सासूबाईंचे साश्रुनयन, छोट्या व्हिलन्सच्या कानगोष्टी, प्लॅन कॅन्सल होणं आणि हीरोईणीचं टायटॅनिकफोड आईसबर्गपण जिंदाबाद. नातीनाती गजर चालू ठेवावा.

सायकोसोशल

5bxbI2aKLLJXKVwLWEHWO3n1gA7qaFi8rgnqFOFUQdOJUbS34JdSfA1Cx64H5stGJason, you’re too fucking metal man
Too metal for your own good
You guys want some more don’t ya
we’re just getting warmed up now man

कुठल्याही समाजाचे आखणीबद्ध नियम, संकेत, परंपरा ह्यांचा दरवेळी बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. संगीताचंही तसंच आहे. आत्तापर्यंतच्या सर्वमान्य असलेल्या संगीतातले बरेचसे नियम पायदळी तुडवून एक प्रकार निर्माण झालेला आहे. रॉक नवीन होतं तेव्हाही तेच. रॅप, हिप-हॉप, फंक आणि ब्लूजचंंही बरचसं तसंच. फरक इतकाच, की समजाची ‘अमान्यता’ ह्यांनी फाट्यावर मारली. ‘आम्ही शोषित/वंचित म्हणून आमचं विचित्र संगीत खपवून घ्या’, किंवा ‘आम्ही तुमचं आवडून घेतलं, आता तुम्हाला आमचं संगीत आवडायला काय झालंय’, ‘आम्ही यंग, तुम्ही आऊटडेटेड’ असा अभिनिवेश ह्यांच्यात कधीच नव्हता. हे संगीत आवडणं-न आवडणं हा सर्वस्वी व्यक्तिगत आवडींचा भाग आहे. एखादं गाणं तुम्ही ऐकलंच पाहिजे, आणि नाही ऐकलंत तर तुमचं हे करु अन् ते करु असलं काही सांगायला कोणी इथे बसलेलं नाही. हे वर्षानुवर्षे गाजलेलं आहे. एकाएकी यंत्रणेला जाग आणणारा निर्बुद्ध खेळ नाही, की आईवडलांपरोक्ष चालणारी बुवाबाजी संस्कृती नाही. इथे सगळ्यांना स्वत:चं स्ट्रगल वाढून ठेवलेलं आहे.

प्रसंग १:
काही लोकांना ह्यात्या ओळखी काढून/कोट्यातून चांगल्या ठिकाणी नोकरी/चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. सीव्ही/गुण बरेच चांगले, भाषांवर चांगली पकड, बाकी बऱ्याच अचिव्हमेंट्स असतानाही तुम्हाला बऱ्याच चपला झिजवाव्या लागतात. क्षणोक्षणी तुम्हाला तुमच्या आणि ‘त्यां’च्या आयुष्यातली तफावत दिसत राहते. तुम्हाला तुमच्या ह्या भाकड व्यथेचाही कंटाळा आलेला असतो. शिवाय तुमचं तोंड ह्याबाबतीत चांगलंच बंद केलं गेलेलं असतं.

I push my fingers into my eyes
It’s the only thing that slowly stops the ache

प्रसंग २:
तुमच्या घराजवळ काहीतरी मिरवणूक असते. भयानक डॉल्बी सिस्टीम. तुमची उद्या परिक्षा आहे. तुमच्या खिडकीची तावदानं, दरवाजे भन्नाट थरथरत असतात. पोलिस ती मिरवणूक सुखरूप पार कशी पडेल ह्याच फंदात. परत एकदा तुमचं भविष्य, ह्या एखाद-दोन तासांवर दोलायमान.

Jesus, it never ends, it works its way inside
If the pain goes on…!

प्रसंग ३:
उगीच एक नातेवाईक, स्वत:चा फायदा नसताना फक्त मत्सरापायी तुमच्या कामात काड्या घालतो. तुम्ही त्याचं वय तुमच्या दुप्पट असल्याने काही फार करु शकत नाही. हे चालत नसेल तर एक आर्बिट्ररी प्रेमभंग वगैरेचा प्रसंग घालावा.

असेच आणखी काही प्रसंग. सभोवतालच्या गोंधळात, स्वत्व हरवल्याचा भास क्षणोक्षणी होत असतो. अगतिकता, नैराश्य, हतबलता वगैरे सगळं फालतू आहे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे, तो कशातही डळमळीत झाला नाही पाहिजे इत्यादी बच्चन लहानपणापासून मिळत असतंच. किंबहुना, तुम्हीही ते कोणालातरी दिलेलंच असतं कधी ना कधी. पण. दरवेळी, सभोवतालचे हजारो लोक त्यांचं नैराश्य इथे तिथे काढत असताना पाहून तुम्ही पराकोटीचे शांत/संयमी; एकदम मर्यादापुरुषोत्तम (किंवा मर्यादास्त्र्यौत्तमा) बनायचा प्रयत्न करत असता. त्यामुळे, ‘नकारात्मक भावना’वगैरे ज्या असतात त्यांचा निचरा फक्त रौद्र रुप धारण करतो. एक भयानक राग – तो अर्थ/समाज/राजकीय अशा कुठल्याही व्यवस्थेविरोधात, नातेसंबंधांत, अक्षरश: कुठेही; असू शकतो, जो साचत राहतो.

I’ve screamed until my veins collapsed
I’ve waited last, my time’s elapsed
Now all I do with live with so much fate

तुमचा एक मित्र असतो. कमअस्सल अशाच प्रसंगांमधून जाणारा. पण त्याचं डोकं बरंच ताळ्यावर असतं. तो रांगांमध्येही शांत असतो बऱ्यापैकी. त्याचे हेडफोन/इअरफोन कानात कायम अडकवून तो जोरजोरात डोकं हलवत असताना तुम्ही त्याला कमीत कमी दररोज एकदातरी पाहता. मग त्याला विचारलं की तो तुम्हाला तो इअरफोनचा एक जॅक सोपवतो. त्याने आधी तीनदा तरी सांगितलेलं असतं की हे तुम्हाला आवडणार नाहीये म्हणून.
किंवा,
एखादा मारधाड चित्रपट पाहताना/गेम खेळताना/जिम मध्ये/बॉक्सिंग क्लास मध्ये कुठेही तुम्ही ‘ते’ ऐकता. छान वाटतं. ग्रिपींग. जोरकस. जबरी. जरा शोधाशोध करून तुम्हाला ‘ते’ काय आहे ते कळतं.

I wished for this, I bitched at that
I left behind this little fact
you cannot kill what you did not create

शब्द तुम्हाला प्रचंड आवडतात. संगीत तर भन्नाटच. एखादी चांगली फुगलेली जखम कापावी आणि भळाभळ रक्त वाहत असावं, आणि ते बरेच दिवस अंगावर वागवलेलं; कमी कमी होत गेल्यासारखं वाटावं. अगदी तुम्ही स्वत:च ते गाताय, ड्रम अगदी मनापासून झोडताय असं तुम्हाला वाटतं. एकाएकी तुमच्यातही पाशवी शक्ती आहे, आणि परिस्थिती अगदीच काही हाताबाहेर नाही गेलीये असं काहीसं वाटू लागतं.
तुम्ही अधिक कान देऊन ऐकता. काही बँड्जची तुम्हाला नावं कळतात. तुम्ही यूट्यूबवर जाऊन ती गाणी ऐकता. युट्यूब तयारच असतं अजून माल घेऊन. तुम्ही आता अधिकृतरित्या ‘मेटलहेड‘ झालेले असता. ह्या कलाप्रकाराबद्दल (genre) तुम्ही भलभलतं काहीतरी नेहमीच ऐकलेलं असतं. हे सैतानाचं संगीत आहे, हे म्हणजे विकृत अत्याचारी माणसांचं संगीत आहे, सगळ्यात वर म्हणजे हे तर संगीतच नाहीए.. हेही ऐकलेलं/वाचलेलं असतं. नंतर इथेतिथे लोक अजून लिहीतात,

प्रचंड गोंगाट असलेले हे संगीत ऐकून एक तरुण मुलगा आत्महत्येला प्रवृत्त झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

हे कुठे काय, खरंच झालं का, नक्की ते संगीत ऐकल्यानेच झालं का वगैरे प्रश्न ह्या लोकांच्या मते वादातीत असतात. प्रचंड गोंगाट असतो. पण तो ‘तुमचा’ असतो. तुमच्यापुरता. आजूबाजूला चालू असलेले नसते गोंगाट, ते गोंगाट नाहीतच अशी धारणा असलेल्या, कधीही हे संगीत न ऐकलेल्या लोकांची आपल्या संगीत आवडी-निवडींवर भाष्य करायची क्षमता आहे का, हे प्रश्न तुम्हाला पडतात.

‘Bout time I set this record straight
This needle nose punchin’ is makin’ me irate

मेटल हे संगीत नाही. किंबहुना, सर्वमान्य संगीताच्या निकषांवर अजिबात आधारित नसलेलं ते काहीतरी आहे, अशी आपली धारणा आहे. पण तेच त्याच्या यशाचं द्योतक आहे. कधीकधी त्या संगीतात ताल व्यवस्थित असतो. एसीडीसी, रॅमस्टिन, फाईव्ह फिंगर डेथ पंच. ह्याचे शब्द बरेचदा व्यवस्थेविरोधात असतात. ह्यांच्या गाण्यांत क्रांतीची नसली, तरी बंडाची, उठावाची भाषा असते. शांतपणे बसू न देण्याची भाषा असते. बाकी मृत्यूतर सोकावलेला आहेच की इथेतिथे घास घ्यायला, त्याचं इतकं स्तोम कशाला?

‘क्रांतीकारक’ वगैरे तर साधारण संगीतही कधीच नव्हतं, किंबहुना, असे जुनेच निकष लावून जर हे संगीत पहायचं असेल तर त्याच्याकडून क्रांती वगैरेच्या अपेक्षा कशाला?

मेटल संगीत(?) हे एक युद्ध आहे. व्यवस्थेविरोधातलं. हे अंगात भरपूर जोम, ॲड्रेनॅलिन असलेल्या तरुणांचं संगीत आहे. समाजातल्या मुळात असलेल्या-नसलेल्या सगळ्याच चौकटी उद्ध्वस्त करणारं हे संगीत आहे. मग त्या काहीही असोत- संधींचा अभाव, समाजातली असमानता (‘असहिष्णुता’ लिहीलं तर बोनस पॉइंट्स मिळतील का?) अपंग न्यायव्यवस्था, सुमारांची सद्दी ह्याविरोधातलं हे बंड आहे. ह्याबाबतीत एकवाक्यता आणायची असेल, तरुण मनं (शरीरं नाही, मनंच!) एकत्र आणायची असतील तर त्यांना भिडणारं, त्यांना भावणारं, उर्जादायक असं गीत लिहीलं जाणं अपरिहार्य आहे, आणि हेच प्रत्येक संगीतकाराचं अंतिम ध्येय असतं. त्यामुळे जर तरुण मनं तिथे ओढली जात असतील, तर तेच त्याचं यश आहे, आणि ते ‘कालौघा’त बदलायला वेळ लागणार नाही.

विकसित देशांमध्ये साधारण सुखसोयी सहज मिळत असल्याने एखादी भावना तिच्या अत्युच्च, आदिम रुपात प्रगटणं जास्त शक्य आहे. म्हणून संपूर्ण संगीतप्राकाराला काही हिडीस घटनांमुळे रद्द ठरवणं हा रुचीहीनतेचा कळस आहे. खरंतर विकसनशील देशांना, त्यांतल्या तरुण, कर्तबगार पिढीला मात्र किंबहुना अशाच अस्वस्थ, आक्रमक संगीताची गरज आहे. तो त्यांचा आवाज आहे, आणि स्वघोषित संगीतज्ज्ञ हा कालौघ रोखू शकणार नाहीत.

राहता राहिला प्रश्न नैराश्याचा. मृत्यू, रडारड ही अनेकानेक ‘क्लासिक’ गाण्यांतून दिसलेली आहे. गज़ल हा जवळपास अख्खा प्रकार मृत्यू, दारु (अमली पदार्थ!) ह्यांवर आधारित आहे. अतिशय संथ आणि नैराश्यातून बंड न करता, ते नैराश्य चक्क साजरं करणारं, त्या नैराश्यातच दारू इत्यादींचं सेवन करत बसून रहा असं उपदेश करणारं हे संगीत अगदी दर्दींची आवड, ‘अभिजात’, सर्वमान्य, ‘एलिट’ म्हणून ओळखलं जातं.

हम ना करेंगे प्यार, तेरे बिना जिंदगी से शिकवा, हंगामा हैं क्यूं बरपा पासून
भरे नैना, तनहाई, जरुरी था ह्या गाण्यांत ते ठासून भरलेलं आहे. पण ही गाणी अप्रतिम म्हणून गणली जातात; आणि त्यांच्या जागी ती आहेतही.

I gotta say what I gotta say, then I swear I’ll go away
But I can’t promise you’ll enjoy the noise

ह्या भाकड रडारडीला कंटाळून, जगाचे सगळेच नियम पायदळी तुडवून बनलेलं ते संगीत आहे. त्यात भाषा नैराश्याची असली, तरीही संगीत धगधगतं, त्या नैराश्यातून पेटून उठणाऱ्या माणसांचं, अशाच उष्ण रक्तांच्या माणसांसाठी आहे. स्लिपनॉट, अव्हेंज्ड सेव्हनफोल्ड, मेटॅलिका, स्लेअर ही त्यांच्यातली काही नावं. त्यांचं संगीत हे बंडखोर आहे. ते फक्त आणि फक्त, ह्याच माणसांसाठी बनवलेलं आहे.
सरसकट ते टीनएजर्सवर प्रभाव पाडण्यासाठी केलेलं आहे ह्या आरोपात काहीही तथ्य नाही. खरंतर त्याचा अपप्रचारच इतका होत असतो की हे संगीत आवडणं, ही एक चॉईस असते. परत सामान्य गाणी ऐकत असलेल्या कोणत्याही माणसाला ते चटकन आवडण्यासारखं नाहीच. एखाद्या संस्कृती किंवा नियमबद्ध खेळासारखं ह्यात अडकायचं बंधन नाही. तुमचा फोन, तुमचा म्युझिक प्लेअर. नाही आवडलं की करा डिलीट. इथे तुमचं आयुष्य बरबाद करायची धमकी नाही, की डिलीट बटण दाबायला तुमच्या बोटांना मनाई नाही.
जाता जाता इतकंच;
नैराश्यासाठी हे संगीत क्रांतिकारक न वाटता काहीतरी तालमात्राबद्ध विलापिका ऐकणाऱ्यांनी ह्याच्या वाटेला जाऊ नये. वाटेला गेलात, तर ते ऐकणाऱ्यांबद्दल काहीतरी अवाजवी टोकाचं मतप्रदर्शन करु नये. तुम्हाला जी गोष्ट आवडत असेल, तिच्याबद्दलही लोकांची इतकीच टोकाची मतं असू शकतात ह्याचं भान ठेवावं.


Can you read between the lines?
Or are you stuck in black and white?
Hope I’m on the list of people that you hate
It’s time you met the monster that you have helped create

(उद्धृत ओळी ह्या मेटॅलिका, स्लिपनॉट आणि फाईव्ह फिंगर डेथ पंच ह्यांच्याच व्हिप्लॅश(!), ड्युॲलिटी, स्पिट इट आऊट आणि मीट द मॉन्स्टर ह्या गीतांतून साभार.
प्रस्तुत लेख हा ह्या लेखावरच्या मेटल म्युझिकबाबत भागाबद्दलची प्रतिक्रिया आहे. सरसकट एका चांगल्या कलाप्रकाराला उगीच काळिमा फासणे, त्याच्याबद्दल टोकाचा अपप्रचार करणे, आणि अनिष्ट प्रकारांशी त्याची तुलना करणे ह्याबाबत.)

Sacrosanct – अतिपवित्र

“राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहिल्या कारणाने मारहाण”

“साडीच्या पायाजवळच्या भागावर तिरंगा असल्याकारणाने जाहीर माफी”

“तिरंग्याच्या आकाराचा केक कापल्याकारणाने क्षमायाचना”

“सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी एक पणती”

“जवान देशासाठी इतकं करत असताना तुम्ही इतकं… ही करू शकत नाही?”

“सर्र, इस चीझ के बारेमे नही बोलनेका!”

“…. थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं. यावेळी ते तिच्या अपयशाचं होतं. प्रेमातल्या आणि जीवनातल्या अपयशाचं ..डेथ सर्टिफिकेट. http://www.misalpav.com/node/35641&#8221;

वरील सगळ्या गोष्टींत सामान काये? वाचा.

माणूस हा सामाजिक प्राणी असला तरी त्याला त्याच्या फेलो प्राण्यांबरोबर ‘कनेक्ट’ व्हायला काहीतरी माध्यम लागतं. एकदा हे कनेक्शन जुळलं, की आपसूकच त्याला सर्वांहून वरचढ व्हायचा ध्यास लागतो. प्रयत्नांची योग्य जोड मिळाली की त्याला ते बऱ्याच प्रमाणात जमतंही. ह्यात बरीच प्रगती होऊ शकते/होते, आणि समाजाचं आरोग्य निकोप राहतं.

तर, ‘कनेक्ट’ कसे होतात लोक? ज्ञान/अर्थार्जनाच्या निमित्ताने, किंवा त्यांच्यातल्या समान दुव्याच्या आधाराने. ती एखादी (प्राप्त) कला असू शकते, किंवा (निसर्गदत्त) धर्म/जात/व्यंग इत्यादी. अशा संघटना साधारणतः एक गोष्ट/व्यक्ती अगदी शिरोधार्य मानून चालतात. ही गोष्ट त्या समान दुव्याच्या कळसस्थानी असते. हा सिम्बॉल सर्व सदस्यांसाठी Sacrosanct असतो. ह्या शब्दाचं विवेचन पुढे येईलच.

पुढे, कोणत्याही व्यक्तीला हा सगळा प्रकार फार ‘भारी’, किंवा सर्वमान्य वाटतो. त्यानंतर त्या व्यक्तीच्या व्यक्तित्त्वानुसार ती तीन मार्गांनी जाऊ शकते.

१. तो सिम्बॉल स्वतः शिरोधार्य मानणं

२. तसाच स्वतःचा दुसरा सिम्बॉल व पर्यायाने स्वतः वेगळा ‘कल्ट’ बनवणं

३. तो सिम्बॉल नाकारणं.

…प्रस्तावना बर्रीच लांबलीये.

इतकं सविस्तर, आदिम प्रेरणांपासूनचं विवेचन फक्त ह्यासाठी, की आजकालची प्रत्येक गोष्ट ह्या अशा sacrosanct बाबींनी भरलेली आहे. Sacrosanct ह्या शब्दाचा अर्थ होतो ‘अतिपवित्र’, किंवा टीका/विश्लेषण करण्यापलिकडे पवित्र.

मुळात ‘रॅटरेस’ चा काळ असल्याकारणाने प्रत्येेकाला आपली प्रत्येकच गोष्ट दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीपेक्षा किती श्रेष्ठ हे ओरडून सांगायचा अट्टाहास असतो. ह्या गोष्टीत आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा बहुमताची गरज असते, तेव्हा ह्या Sacrosanct गोष्टी फार मदतीला येतात. कारण, त्या निर्विवाद अतिपवित्र असल्यामुळे बहुतेक ज्यन्तेचं पाठबळ नेहमीच मिळतं.

त्यामुळे,

जेव्हा राष्ट्रगीतासाठी कोणाला उभं राहून,एका मिन्टात आपली देशभक्ती ‘सिद्ध’ करण्याची गरज नाटत नसेल, तेव्हा त्याला मारायला सरसावणाऱ्या पहिल्या हातास माहित असतं, की बाकी हात निर्विवादपणे मदतीस येतील.

सध्या अशी एक गोष्ट आपली देशभक्ती आहे. म्हणून रस्त्याजवळच्या शाळेतलं धूसर राष्ट्रगीत ‘रोजका ही है यार’ म्हणून दुर्लक्षिलं जातं, परंतु थेटरात उभं न राहणाऱ्यांना मारहाण करणं सहज जमतं. अशी अन्नेक उदाहरणं देता येतील. ही प्रतीकं आपल्या एकात्मतेची, अभिमानास्पद असली तरीही अशा वागणुकीमुळे त्यांना फुकाचं देवत्व बहाल होतं, आणि उगीच कोणीही उठून त्यांवर शिंतोडे उडवून शांतता धोक्यात आणू शकतो. उगीच भलत्याच वादांत ही Sacrosanct प्रतीकं घुसडून स्वतःचे मुद्दे पुढे रेटू शकतो, आणि बरंच काही. उ

गीच ‘bully’ करणाऱ्यांच्या हातात तर ही आयतीच कोलीतं मिळतात. सत्ताधारी ही प्रतीकं पुढे करून स्वतःच्या लफड्यांवर पांघरूण घालू शकतात, किंवा कमीत कमी पांघरुणं विकत घ्यायला वेळ तरी काढू शकतात. (संदर्भ: आजकालच्या घटना-शिवस्मारक इत्यादी आणि House of Cards.)

हे जवळपासच्या सगळ्याच गोष्टींत दिसून येतं. हे ‘आयडॉल्स’ एक व्यक्ती, धर्म, देव, संत, राजकारण्यांपासून अगदी सिरीअल्स, सिनेमे, कलाकार, बँड्स, ब्रँड्स, उत्पादनांपर्यंत. जनरली, हे ‘सगळ्यांना आवडतं’ म्हणून पब्लिक ह्यामागे पडतं. मला हे आवडत नाही म्हणणाऱ्याचं जे एलिअनेशन होतं, त्याला ९०% लोक घाबरतात, आणि त्या जथ्थ्यात सामिल होतात. अर्थात निर्विवादपणे जनमान्यता मिळणाऱ्या गोष्टीही असतात ह्यात, परंतु ह्या ‘फुगवून sacrosanct’ केलेल्याच जास्त. आणि एकदा ह्या गोष्टी ‘अतिपवित्र’ झाल्या, की त्यांतले दोषही गुणांसारखे दिसू लागतात. लोक त्यांच्यातल्या कोणाचीही हिरीरीने बाजू घेऊन भांडू लागतात, कायदेही हातात घेतात इ. थोडक्यात, लोक rationale विसरतात आणि अराजक माजते.

(उदाहरणार्थ:

छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या दोनपैकी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन अक्षरशः काहीही केलं तरी लोक ते पटकन मान्य करतात. नवीन होणारं शिवस्मारक असो किंवा काहीही. त्यांचं चित्र प्रचारापुरतं ब्यानरवर डकवणं असो, किंवा त्यांचं नाव घेउन स्वत:चे मुद्दे पुढे ढकलणं असो.

 

सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर ह्यांच्यावर एआयबीच्या तन्मय भट ह्याने काढलेला व्हिडीओ. खुद्द त्या दोघांना नसेल पोहोचली इतकी तोशीस पब्लिकने स्वतः घेतली.

बाबासाहेब पुरंदरे ह्यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार, त्याचा विरोध आणि पाठिंबा ह्यावारचं राजकारण.

अमिताभ बच्चनच्या लेव्हलला जायची शाहरूख खान ह्याची धडपड. आपल्या तद्दन मसाला चित्रपटांचं उदात्तीकरण इत्यादी.

गडकरींचा पुतळा उखडणे, आणि तो परत बसवण्यावरून झालेलं राजकारण.

सोशल मिडीया लेखक:-  Terribly tiny tales आणि तसे बरेच. पोलीस, डॉक्टर/नर्स, सैनिक, आई/वडील/भाऊ/बहीण ह्यांच्याबद्दल गोग्गोड लिहून स्वतः फार साहित्यिक असण्याचा आव आणणे, किंवा कथेतील पात्राचं व्यंग/मृत्यू सारख्या अतिपवित्र गोष्टी दाखवून कथा एकदम डीऽऽऽप करायचा प्रयत्न करणे. वरील उदाहरणांतलं शेवटचं पहा. दुसऱ्या एका दर्जेदार संस्थळावर ह्या कथेच्या धज्जीयाँ उडाल्या होत्या. मिसळपाव वर ते टिकलंय, आणि का, त्याचं कारण वर दिलेलं आहे.)

तीनडॉटी लेखक

आजकाल आपल्या भारतात हे तीनडॉटी लेखक फार माजलेत.

अगदी तण उगवावं तसं. कोणीही उठतो आणि आपली साहित्यिक भडास कागदावर काढून मोकळा होतो.

वरच्या परिच्छेदात माझंही काय फार वेगळं नाही झालंय असं स्पष्ट दिसतं.

मला वाटतं ‘शेरलॉक’ (होम्स) मध्ये हे वाक्य आहे-

That’s the frailty of genius, John, he requires an audience.

तर, गोष्टीला तोंड कुठे फुटलं, तर पेपरांमध्ये कोणालाही उचलून ‘सिद्धहस्त’ वगैरे लेबलं लावणं आजकाल जोमात आहे. हे आजकालचे नट/ट्या उठसूट कशावरही प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. त्यात रात्रीची जास्त झाली किंवा सकाळी अपचनामुळे थोडं जास्त वेळ ‘बसावं’ लागलं किंवा इतर नैमित्तिक कारणांमुळे साहित्यिक कढ दाटून यायला लागले की ते कागदावर सांडायला सुरूवात होते. आता हे सगळं आपापल्या डायरीत ओकून मोकळं व्हावं तर नाही. आता त्या वरच्या क्वोटचा संदर्भ असा, की त्यांना ऑडियन्स अॅप्रिसिएशनचीही भयानक हाव असते. (जिकडे हाय फंक्शनल सोशिओपाथची ती कथा, तर ह्यांचं काय?) मग, जागा आणि गल्लाभरू संपादक छापायला तयारच असतात. वाचणारं पब्लिकपण झकास. ते एकतर ‘भावा तूच छावा’छाप, किंवा ‘wannabe तीनडॉटी’ असतं. (विदाऊट लॉस ऑफ जनरॅलिटी) ह्यांतलं पहिलं कळलं असेलच, दुसरं म्हणजे, असा मी असामी (पु.ल.) मधलं नानू सरंजामे छाप.

किंवा,

बरेचदा कळायचंच राहून जातं… काय सांगायचं होतं… काय कळलं…. काळ खायला उठतो जेव्हा कळण्यामागचा अर्थ मनात साकळतो…

इत्यादी फेसबुक स्टेटस किंवा इन्स्टाग्राम बायो ठेवणारे. तीनडॉटी शब्दाची व्युत्पत्ती आता लक्षात आली असेल. (साधं ‘मी ट्यूबलाईटच आहे जरा’ ह्या चार शब्दांचा तीनडॉटी कल्पनाविस्तार करणारे.) हे दोन्ही लोक वरच्या तथाकथित साहित्यिकांना डोक्यावर घ्यायला कमी करत नाहीत. मग त्या साहित्यिकांच्यापण अंगावर कोंबडीभर मांस चढतं. हे दुष्टचक्र सुरुच राहतं.

ह्यांचा त्या जिनिअसनेसशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसला तरीही लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी ते काहीही चाळे करायला सहज धजावतात. करोत बापडे. आपलं काय? आपण चॅनेल बदलायचा किंवा सरळ ‘आपल्यासाठीच करताहेत’ असं समजून स्वत:ची करमणूक करून घ्यायची. पण हे सगळं जेव्हा लेखनात उतरतं तेव्हा मात्र अक्षरश: भेजा फ्राय होतो. आपण फार मोठे विचारवंत कसे आहोत, हे दाखवायची भयानक हाव असते अशा लोकांना. बरं. हे झालं त्यांच्याबाबत. आता त्यांचा बहुतांश ऑडीअन्स.

बऱ्याच दिवसांच्या रिसर्च नंतर मी ऑडीअन्सच्या ३ कॅटेगऱ्या केलेल्या आहेत. मी ज्ञानार्जन/वित्तार्जनाच्या निमित्ताने बव्हंशी ह्याच लोकांमध्ये राहतो.

  • महाभन्नाट लोक. ट्रकच्या मागे असणाऱ्या क्वोट्सचे जनक. एकदा एका रिक्षामागे वाचलेलं. “तुला न विसरायला तू काय हिरोईण नाही. जगलो तर आईचा मेलो तर साईचा.” मी ट्राफिकची पर्वा न करता त्याला सलाम ठोकलेला. हे पब्लिक सोशल मीडिया वर पण भयाण पसरलेलं आहे. स्वत:चे गॉगल लावून भलतीकडेच पाहत फोटो काढणारे, शुभ सकाळ, शुभरात्रीच्या इमेजेस दिवसभर पाठवणारे इत्यादी. ह्यांना मुळातच काही स्वत: लिहिता येत नाही. जेव्हा उपरिनिर्दिष्ट ३डी लोक लिहून मोकळे होतात तेव्हा हे दणादण लाईक ठोकून मोकळे होतात. प्रमाण मराठी भाषा, व्याकरण वगैरे चिंधी गोष्टींकडे ते पाहत नाहीत.
  • १ पेक्षा जऽरा सुधारित आवृत्ती. हे लोक फार काही करत नाहीत. त्यांना पुढे येणाऱ्या क्रमांक ३ कॅटेगरीमध्ये समाविष्ट व्हायचा भयानक अट्टाहास असतो. हे लोक बराच काळ क्रमांक १ मध्ये काढून आलेले असतात. हे लोक सगळीकडे गप्प गप्प असतात. त्यांनी तोंड/पेन उघडलं की आपल्याला कळतं की ह्यांची टाईप १ मध्ये इंटर्नशिप झालीये बरीच.
  • हे लोक कुठे आढळले की ह्यांच्याशी मैत्री करावी. हे टोट्टल फन पॅकेज असतात. ह्यांचं मराठी बरं असतं जनरली, पण लिहायला गेले की भन्नाट मजा येते. ह्यांनी इथे तिथे वाचलेलंही असतं आणि त्या स्टायली मारायला ते जातात. प्रॉब्लेम असा की, ललित लेखनातली स्टाईल ते तत्त्वचिंतनात मारतात आणि त्याचं सगळंच लिखाण विनोदी कॅटेगरी मध्ये येतं. ह्या लोकांची प्रातिनिधिक पोष्ट पहा.

शुभ सकाळ
चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं…
“योगी” होण्यापेक्षा “उपयोगी” होणं जास्त महत्वाचं असतं…
एखाद्या व्यक्तीचा “प्रभाव” असण्या पेक्षा “स्वभाव” चांगला असणं फार महत्वाचं आहे…
आयुष्य खुप छोटे आहे ते आनंदाने घालवायला हवे.ll
तुमचा दिवस आनंदात जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.।।
काळजी घ्या
तुमचा दिवस सुखाचा जावो इत्यादी.

(अधिक माहितीसाठी फेसबुकवर ‘दवणीय अंडे’ लाईक करा.)

हे लोक कॅटेगरी २ चे आदर्श असतात. ह्यांना प्रथितयश लेखक व्हायची उर्मी असते, पण माहितही असतं की जमणारं नाही. मग काहीही कसलंही लिखाण तथाकथित ललित साहित्यात आणायचा ह्यांचा अट्टाहास सुरु होतो. हेच गुणधर्म घेऊन वर नमूद केलेली नटलेखक मंडळी भलत्याच फील्डमध्ये घुसतात. मुद्दा असा, की हे सगळे क्रमांक १, २, ३ सगळे ‘आपल्यातले’च असतात. त्यांनाही कुठेतरी एक नाव मिळवायची, कमीत कमी एक ‘आयडेंटीटी’ मिळवायची हाव असते म्हणून हे चाललं असतं, आणि जनरली (सेन्सिबल) लोकांकडून ते तसंच पाहिलंही जातं. ही जी लब्धप्रतिष्ठित मंडळी असतात त्यांच्याकडे उरलंसुरलं (किंव्हा बव्हंशी संपलेलंच) ‘ग्लॅमर’ आटायला लागलं की त्यांना ते साहित्यिक कढ दाटून येतात. मुख्य म्हणजे, वर म्हटल्याप्रमाणे सगळ्या क्रमांकांचं पब्लिक त्यांना डोक्यावर घेतं, संपादकही भरभरून       पठडीतले लेख लिहितात आणि ह्याचं बरंच फावतं. साधारण ह्या गोष्टी पाहिल्या की आपण हे समजून जावं.

  • बॉलर हातात बॉल कसा पकडतो, तसा केलेला हात (काहीतरी फोड करून सांगत असल्याच्या पोझमध्ये) आणि (दुसऱ्या हातात, किंवा असाच) माईक असलेला फोटो.
  • ‘व्यक्ती नव्हे संस्था’ हे तीन शब्द कोणत्याही वाक्यात आढळले की.
  • आपल्याला त्या प्राणिमात्राचं नाव तिथेच कळलं तर. (किंवा अंधुकसं आठवत असेल तर)
  • भरभरून, उत्स्फूर्त ह्यापैकी कोणत्याही एका शब्दानंतर प्रतिसाद लिहिला असेल तर. (मुंबईत अक्षरश: संडासच्या सीटांच्या प्रदर्शनालाही ‘भरभरून प्रतिसाद’ मिळतो.)
  • तुम्ही जनरली त्या प्राणिमात्राचं नाव एकेरी घेत असाल आणि पेपरात आदरार्थी बहुवचन वापरले असेल तर.

असो. असे बरेच प्वाईन्ट काढता येतील. पण वाचकांना मुद्दा कळला म्हणजे झालं. ह्या लोकांना साधारणत: एक पूर्णविराम देऊन थांबताच येत नाही. त्यांचे अजून दोन पूर्णविराम सांडतातच. ‘कंटेंट’च्या नावाने बोंब असली तरी ‘चालू’ टोपीकवर भरभरून शाई ओकायला ह्यांची पेनं तयारच असतात. आपण ह्या सगळ्यात छानपैकी सकाळी कपात चहा भरून घ्यावा. कुठेही स्वस्थ जागी बूड टेकवावं आणि अथपासून पान आठपर्यंत हे सगळं वाचावं. पान आठ नंतर स्पोर्ट्स वगैरे गोष्टी असतात. फक्त चांगल्या चांगल्या. स्वीट डिश शेवटी. मग छान पैकी दुसऱ्या दिवशी आज ज्या माणसाच्या बिळात आजच्या यशस्वी लेखकाने धुरी घातलीये, तो काय करेल ह्याची कल्पना करत चहा मिटक्या मारत संपवावा. अप्रतिम लागतो. कसाही असला तरी. मग छानपैकी आंघोळ करावी आणि हे सगळं आजच्या दिवसासाठी विसरून जावं. उद्या ते तयार असतातच तुमची एन्टरटेनमेंट करायला. एकदा ते तुम्हाला एन्टरटेन करायला लिहितायेत हे मनाशी पक्कं धरलं ना, की आयुष्य ‘लय भारी’ होऊन जातं.

करा ना विचार, हे लोक नसते तर खरे चांगले लेखक ओळखता तरी कसे आले असते?